स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कुटुंबीयांना त्रास, CJPच्या सहसंयोजकाचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) सहसंयोजक सौरव दास यांनी पुद्दुचेरी पोलिसांवर त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करून त्यांना ‘धमकावण्याचा’ आरोप केला आहे. केंद्र सरकारच्या सांगण्यावरून आपल्या कुटुंबीयांना त्रास दिला जात असल्याचा दावा दास यांनी केला आहे. मात्र, पुद्दुचेरी पोलिसांनी ही कारवाई स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नियमित सुरक्षा उपाययोजनांचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे.

दास यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत पुद्दुचेरी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. ‘दोन तासांपूर्वी पुद्दुचेरी पोलीस माझ्या कुटुंबीयांच्या घरी आले आणि त्यांनी त्यांची विविध प्रकारे चौकशी केली. हा त्रास का दिला जात आहे? पोलिसांना असे करण्याचे आदेश कोणी दिले आणि कोणत्या कारणासाठी? ही कायदेशीर प्रक्रिया आहे का?’ असा सवाल त्यांनी केला.

पुद्दुचेरीतील भाजपसमर्थित सरकार आपल्या कुटुंबीयांना ‘धमकावत’ असल्याचा आरोपही दास यांनी केला. अशी कारवाई केंद्र सरकारच्या सांगण्यावरून होत असून, पुद्दुचेरी सरकारच्या कार्यपद्धतीशी हे सुसंगत नसल्याचे त्यांनी म्हटले.

‘मला गप्प करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही’

पोलिसांच्या या कारवाईमागे आपल्याला गप्प करण्याचा उद्देश असल्यास तो कधीही यशस्वी होणार नाही, असे दास यांनी म्हटले. अशा प्रकारच्या दबावामुळे आपण घाबरणार नसून, यामुळे अधिक चांगली व्यवस्था निर्माण करण्याचा आपला निर्धार आणखी मजबूत होईल, असे त्यांनी सांगितले.

‘पोलिसांनी कायद्याचे पालन करण्याऐवजी गुंडांसारखे वागू नये,’ अशा शब्दांत दास यांनी पोलिसांवर टीका केली. आपल्या कुटुंबीयांची केंद्र सरकारच्या सांगण्यावरून पुडुचेरी सरकारकडून चौकशी का केली जात आहे आणि यामागे नेमका आदेश कोणाचा आहे, असा प्रश्नही त्यांनी पुन्हा उपस्थित केला.

दास यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नुकत्याच झालेल्या पुद्दुचेरी दौऱ्याचाही संदर्भ दिला. दोन दिवसांपूर्वी अमित शाह पुडुचेरीत आले होते. यावेळी त्यांनी पुद्दुचेरीचे गृहमंत्री आणि नायब राज्यपाल यांची भेट घेतली होती. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना नायब राज्यपालांची ‘डोळे आणि कान’ अशी ओळख असल्याचा उल्लेख करत दास यांनी या बैठकीत त्यांच्या कुटुंबीयांना धमकावण्याची रणनीती ठरवण्यात आली होती का, असा सवाल केला.

दरम्यान, पुद्दुचेरी पोलिसांनी सौरव दास यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नियमित सुरक्षा उपाययोजनांचा भाग म्हणून ही भेट देण्यात आली होती, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.