
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सभागृहातून गायब असलेले केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी बुधवारी वृत्तसंस्थांशी संवाद साधला. सभागृहातील स्वतःच्या अनुपस्थितीचे त्यांनी समर्थन करत मी चर्चेसाठी तयार असल्याचे ते म्हणाले. अमित शहांच्या या विधानावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला. अमित शहा घाबरले असून त्याचे हात पाय लटपटतायत. कारण त्यांचा खेळ आता संपलेला आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असून या पार्श्वभूमिवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. अमित शहा सध्या खोटं बोलत असून ते एक घाबरलेले माणूस आहेत. त्यांचे हात-पाय लटपटत आहेत आणि त्यांचा खेळ संपला आहे. भविष्यात ते मंत्रिमंडळात राहतील की नाही, याबाबतही शंका आहे. देशात घडणाऱ्या नकारात्मक घटनांचे खापर नरेंद्र मोदींवर फोडले जात असले, तरी या सगळ्यामागे अमित शहांचाच हात आहे, हे आता मोदींनाही पटलं आहे असं संजय राऊत म्हणाले.
अमित शहांना संसदेत येण्यापासून कोणी रोखलंय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. आम्ही खासदार आहोत, आम्ही संसदेत जातोय. पण तुम्ही तर गृहमंत्री आहात. अमित शहांना तत्काळ या देशाचं उपपंतप्रधान व्हायचंय आणि मोदींनी त्याला नकार दिलाय, असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला. नवीन रचनेत मोदींचे वारसदार म्हणून मला उपपंतप्रधान घोषित करा अशी शहांची मागणी आहे. पण मोदींनी याला स्पष्ट नकार दिलेला आहे. हे 100 टक्के सत्य असल्याचे संजय राऊत म्हणाले.
तरुणांचे आगामी आंदोलन ईव्हीएमविरोधात असणार
संजय राऊत यांनी आगामी काळात देशातील तरुणांच्या भूमिकेवर भाष्य केलं. मुळात मोदींनंतर अमित शहा नक्कीच नाहीत. मोदींही या देशात किती काळ राहतील याची शंका आहे. कारण आता यापुढे ‘जेन झी’ पिढी आणि देशातील तरुण ईव्हीएमच्या विरोधात जोरदार आंदोलन उभारणार आहेत,असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
तसेच, सत्ताधारी पक्षावर निशाणा साधत त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांसारखे पक्ष फोडून निर्माण झालेली राजकीय वसाहत लवकरच उद्ध्वस्त होईल, अशा खरमरीत शब्दात भाजपवर टीका केली.


























































