
कोलकाता येथील एनआरएस मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात स्टाफ नर्सच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. रुपाली बर्मन (30) असे मयत नर्सचे नाव आहे. रुपाली नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री नाईट ड्युटीवर हजर झाली. यानंतर ती शौचालयात गेली ती बराच वेळ परतली नाही. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दरवाजाचे कुलूप तोडून पाहिले असता आत रुपालीचा मृतदेह आढळला.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, रुपाली बुधवारी रात्री 8 वाजता नाईट ड्युटीसाठी रुग्णालयात आली होती. यानंतर रात्री 9 ते 10 च्या दरम्यान शौचालयात गेली होती. बराच वेळ होऊनही ती बाहेर न आल्याने सहकाऱ्यांनी तिला हाक मारली. आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी कुलूप लावलेला दरवाजा तोडला असता आत रुपाली मृतावस्थेत आढळली. रुपालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूच्या कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपासासाठी न्यायवैद्यक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पोलीस प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.


























































