आदित्य ठाकरे यांनी चिखल तुडवत भर पावसात केली रस्त्याची पाहणी, पेगलवाडीच्या धाडसी विद्यार्थ्यांच्या व्हिडीओची दखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खड्डे आणि चिखलातून वाट तुडवत शाळा गाठावी लागत असल्याची व्यथा मांडणारा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडीच्या विद्यार्थ्यांचा व्हिडीओ देशभर व्हायरल झाला. याची गंभीर दखल घेऊन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी पेगलवाडीला भेट दिली. आदित्य ठाकरे यांनी भरपावसात चिखल तुडवत पेगलवाडीसह नाशिकमधील रस्त्यांच्या दुरवस्थेची पाहणी केली.

आदित्य ठाकरे यांनी नाशिकमधील पेगलवाडी त्र्यंबक रोड, अंबड सातपूर लिंक रोड, कॅनडा कॉर्नर परिसर, शरणपूर लिंक रोडच्या दूरवस्थेची व वाहतूक काsंडीची पाहणी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. ’सिंहस्थाच्या नियोजनशून्य कामांमुळे नागरिक त्रस्त आहेत. कुंभमेळ्याचेही अयोध्येतील चंदाचोरीप्रमाणे झाले आहे. पस्तीस हजार कोटींचे कॉण्ट्रक्ट कोणाला दिले, पैसे कुठे गेले, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

दहा वर्षांपूर्वी त्यांनी निओ मेट्रोचे आश्वासन दिले होते. इथे रस्तेच दिसत नाहीत, मेट्रो कुठून येणार? पंधरा हजार खड्डे बुजविल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात सर्वच रस्ते ख़ड्डय़ात आहेत. मुख्यमंत्र्यांनी इतर कुठलेही शहर दत्तक न घेतलेलेच बरे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी हाणला. या पत्रकार परिषदेस उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, डी. जी. सूर्यवंशी, महापालिका गटनेते केशव पोरजे, महानगरप्रमुख प्रथमेश गिते यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

विशेष बाब म्हणून रस्त्यांसाठी निधी मंजूर करा; मुख्यमंत्र्यांना आवाहन

मुख्यमंत्र्यांनी काल विशेष बाब म्हणून सत्ताधारी आमदाराच्या साखर कारखान्याला 18 कोटी रुपये दिले, त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडीच्या रस्त्यासह राज्यातील दुर्दशा झालेल्या रस्त्यांसाठी विशेष बाब म्हणून कोटय़वधी रुपये मंजूर करावेत, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

– आदित्य ठाकरे यांनी पेगलवाडीच्या मारुती मंदिरात भरणाऱ्या शाळेत जाऊन आदित्य गोहिरे व स्मिता शिद यांच्यासह इतर विद्यार्थ्यांची भेट घेतली. मोठय़ा हिंमतीने प्रशासनाला, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांचे आदित्य ठाकरे यांनी अभिनंदन केले. यावेळी निवृत्ती जाधव, सिद्धेश शिंदे, कैलास खांडबहाले, राहुल ताजनपुरे, सरपंच विलास आचारी, ग्रामपंचात सदस्य विजय वायपंडे, रावसाहेब कोठुळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
नाशिक महापालिकेवर मोर्चा काढणार

नाशिकमधील रस्त्यांच्या दूरवस्थेकडे महापालिका प्रशासन व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने मोर्चाची घोषणा केली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली येत्या सोमवारी, 17 ऑगस्ट रोजी हा मोर्चा निघणार आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून सुरुवात होऊन हा मोर्चा नाशिक महापालिकेवर धडकणार आहे. या मोर्चात नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे,, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

भाजप हा शहर गिळायला निघालेला मोठा मासा

‘कुंभमेळ्याच्या निमित्ताने अख्खे शहर खोदून ठेवले आहे. येथे नागरी सेवांचा जो गोंधळ उडालेला आहे. त्यासाठी प्रशासनाकडे किंवा अधिकाऱ्यांकडे बोट दाखवून उपयोग नाही. त्यासाठी भाजप जबाबदार आहे. भाजप हा शहर गिळायला निघालेला मोठा मासा आहे. भाजप सरकारला फक्ता कॉण्ट्रक्टरच्या खिशाला पडलेले खड्डे दिसतात,’ असा हल्ला आदित्य ठाकरे यांनी चढवला. ’नाशिककरांच्या कराचा पैसा कुठे गेला? चांगले रस्ते गेले कुठे? असा जाबा आता भाजपच्या नगरसेवक, आमदारांना रस्त्यावर थांबवून विचारा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी जनतेला केले.

हातात बाटलीचा माईक… यंत्रणेला सवाल

पेगलवाडीच्या शाळेत चौथीत शिकणारा आदित्य गोहिरे याने प्लॅस्टिकच्या बाटलीचा माईक करून स्मिता शिद या विद्यार्थिनीला पेगलवाडी-गोहिरेवाडी रस्त्याच्या दुर्दशेबद्दल प्रश्न विचारले. स्मिताने तिची व्यथा मांडली. शाळेत ये-जा करताना आम्हाला खड्डे व चिखलामुळे खूप त्रास होतो, याकडे कुणी लक्ष देईल का, असा सवाल करत तिने यंत्रणेला खडे बोल सुनावले.