लिहून घ्या… मोदी-शहांना झोपू देणार नाही! वेडं करून सोडणार, राहुल गांधी यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

’नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना जावेच लागेल. ते राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांना झोपू देणार नाही. त्यांना वेडं करून सोडू, हे लिहून ठेवा,’ असा खणखणीत इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिला.

रचनात्मक काँग्रेस राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलते होते. जंतरमंतरवरील आंदोलनाचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी, अमित शहा, भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्ला चढवला. अमित शहा यांना चाणक्य, सरदार पटेल असे म्हटले जायचे. कुठे गायब झाले ते अमित शहा? ते संसदेतही येऊ शकले नाहीत. आता त्यांना देशवासीयांच्या असंतोषाची धग जाणवू लागली आहे. हा देश आता थांबणार नाही हे त्यांना कळून चुकले आहे, असे राहुल गांधी म्हणाले. ‘नरेंद्र मोदी हे रात्री झोपत नाहीत. त्याची काही उघड आणि काही गुप्त कारणे आहेत. मला हल्ली त्यांच्या कार्यालयातूनच माहिती मिळत असते. आतमध्ये मोठी बंडाळी सुरू झाली आहे,’ असा दावाही राहुल यांनी केला.

मेलोनी समजून मिठी मारली का?

काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना बळजबरीने घट्ट मिठी मारून राहुल यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाची खिल्ली उडवली. मिठी मारणे म्हणजेच परराष्ट्र धोरण असे मोदींना वाटते, असे राहुल म्हणाले. दीक्षित यांनी मेलोनीचा उल्लेख केला. त्यावर, अजून मी तो टप्पा गाठलेला नाही, असा टोला राहुल यांनी हाणला.

भाजप-आरएसएस हा विदूषकांचा समूह

राहुल यांनी यावेळी आरएसएसवर तुफान हल्ला चढवला. ‘देशातील अनेक लोक हल्ली आरएसएस-भाजपला घाबरून आहेत. ब्रिटीश साम्राज्याविरोधात लढताना तुम्ही एखाद्या वेळेस घाबरलात तर समजू शकतो. पण या भेकडांना घाबरण्याची काय गरज आहे? भाजप व आरएसएस हा विदूषकांचा समूह आहे. या समूहाला देशाचे तत्त्वज्ञान, देशाच्या इतिहासाचा काडीचा अभ्यास नाही, अशी टीका राहुल यांनी केली.