
ताडदेवमध्ये एका फ्लॅटच्या विक्रीची जाहिरात सोशल मीडियावर करताना ब्रोकर भावेश कावरे यांनी ‘मांसाहारी असाल तर घर मिळणार नाही’ असे वक्तव्य केल्याने संताप व्यक्त होत आहे. शिवसेना, मनसेने ब्रोकरच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला असून त्याला धडा शिकवू असा इशारा दिला आहे.
ब्रोकर भावेश कावरे याने ताडदेवमधील फ्लॅटची जाहिरात इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या व्हिडीओत तो ताडदेव परिसरातील एका 2 बीएचके घराची माहिती देत आहे. 900 चौरस फुटांचा हा फ्लॅट आहे. या फ्लॅटची विक्री करायची आहे. मात्र तुम्ही मांसाहारी असाल तर हा फ्लॅट तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही प्युअर शाकाहारी असाल तरच हा फ्लॅट मिळेल. शाकाहारी असाल तर तुमचे स्वागत आहे, असे तो व्हिडीओत म्हणत आहे.
दरम्यान, मांसाहारींना फ्लॅट मिळणार नाही, हे वक्तव्य निषेधार्ह आहे. कुणी काय खावे-काय खाऊ नये हे ठरवणारा हा कावरे कोण, असा सवाल पालिकेतील विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. हा कावरे बिल्डरची भाषा बोलत असून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याचा समाचार घेऊ, कुणाचीही मनमानी चालू देणार नाही, असा इशाराचा त्यांनी दिला. तर ‘मनसे’ने कावरेच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेत अशी भाषा करणाऱयांना ‘मनसे स्टाईल’ उत्तर देऊ, असा इशारा नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी दिला आहे. दरम्यान, भावेश कावरे याच्या वक्तव्यावरून झालेल्या वादानंतर त्याने वक्तव्याबाबत माफी मागितल्याचे समजते.
बिल्डरची एनओसी रद्द करा
भाजपची सत्ता आल्यापासून मुंबईत असे प्रकार सुरू आहेत. समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे असे वक्तव्य करण्याचा निषेध आहे. असे वक्तव्य करणाऱया बिल्डरची ‘एनओसी’ रद्द केली पाहिजे, असा संताप शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, वक्तव्यावरून झालेल्या वादानंतर कावरे यांनी इन्स्टाग्रामवरून आपला व्हिडीओ डिलीट केला असून माफी मागितली आहे.































































