
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ड्रग्स माफियांविरोधात मोठी कारवाई केली. वांद्रे येथे एका पुरुषाला चार कोटी किमतीचा ड्रग्स रंगेहाथ पकडून ग्रेटर नोएडा येथे छापा टाकला. तेथे दोघा परदेशी महिलांना पकडून पाच कोटी ४० लाख किमतीचा एमडी व एमडी बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त करण्यात आला.
एक व्यक्ती ड्रग्जचा साठा मुंबईत विकण्यासाठी घेऊन आला असून तो वांद्रे कोर्टासमोरील अंबर हॉटेलच्या शेजारील एका दूध केंद्रासमोर येणार असल्याची खबर एटीएसच्या काळाचौकी युनीटला मिळाली. त्याआधारे पथकाने तेथे सापळा रचून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या व्यक्तीला उचलले. त्यांची झडती घेतली असता त्याच्याजवळ तब्बल २०५० ग्रॅम वजनाचा व चार कोटी किमतीचा एमडीचा साठा मिळाला. त्याला अटक करून चौकशी केल्यावर त्याने हा एमडी ग्रेटर नोएडा येथील कारखान्यातून विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार एटीएसच्या पथकांनी नोएडा येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने एमडी बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. त्या वेळी तेथे दोन परदेशी महिला माफिया मिळून आल्या. त्यांच्याकडून पाच कोटी ४० लाख किमतीचा दोन हजार ६८८ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्स सापडला. एटीएसच्या या धडक कारवाईमुळे ड्रग्स माफियांना मोठा धक्का बसला आहे.






























































