
‘जंतर मंतर’वरील आंदोलन आणि इतर अनेक कारणांमुळे भाजपवाल्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांच्या देशभक्तीचा बुरखा फाटला आहे. त्यामुळेच जे फक्त शासकीय ‘कर्तव्य’ म्हणूनच तिरंगा ध्वजारोहण करीत होते, त्यांच्यावर तिरंग्याचे मोठमोठे कटआऊटस् आपल्या फोटोंसह लावण्याची वेळ आली आहे. ज्यांनी स्वातंत्र्यानंतर पाच दशके आपल्या मातृसंस्थेच्या मुख्यालयावर तिरंगा फडकविला नाही, त्यांना लाखो-करोडो रुपये खर्चून ‘तिरंगा’ यात्रेचा इव्हेंट करणे भाग पडले.
भारताचा स्वातंत्र्य दिन नेहमीप्रमाणे साजरा होत आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत देशाचा स्वातंत्र्य दिन हा भाजपचा किंवा संघ परिवाराचा स्वातंत्र्य दिन असावा अशा राजकीय उत्सवी पद्धतीने साजरा केला जातो. पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर येतात. वेगवेगळय़ा प्रकारच्या पगड्या, कपडे परिधान करतात. ज्या राज्यात भविष्यात निवडणूक असेल त्या राज्याची पगडी, पेहराव ते परिधान करतात, म्हणजे स्वातंत्र्यदिनीही राजकीय नफा-तोट्याचा हिशेब ते करतात. यानिमित्ताने ते भाजपपुरस्कृत उपक्रम राबवतात. तसे या वेळीही झाले. स्वातंत्र्य दिनापूर्वी त्यांनी ‘तिरंगा’ यात्रेचा उपक्रम राबवला व त्याची जाहिरातबाजी केली. जणू भारतात तिरंगा प्रथमच फडकवला जात आहे. आपणच भारतीय तिरंग्याचे निर्माते व रक्षक आहोत अशा थाटात ‘यात्रा’ काढल्या. स्वातंत्र्यासाठी 1947 साली आधी ज्या प्रभातफेऱ्या, सत्याग्रह हाती तिरंगा घेऊन झाला, त्यात भाजपची मातृसंस्था कोठेच दिसली नाही. ज्यांनी कधी तिरंगा या शब्दाबद्दल प्रेम, जिव्हाळा दाखवला नाही, त्या भाजपवाल्यांना अचानक तिरंगा ध्वजाची आठवण झाली. ठिकठिकाणी ‘तिरंगा’ यात्रा काढून
देशभक्तीचे नाटक
केले. एकीकडे ‘तिरंगा’ यात्रा आणि दुसरीकडे ‘हर घर तिरंगा’ अभियान, अशा पद्धतीने भाजपवाल्यांचे राष्ट्रप्रेम उतू गेले. त्यासाठी त्यांनी देशाच्या आजच्या स्वातंत्र्य दिनाचे निमित्त शोधले. त्या भारावलेल्या वातावरणाचा राजकीय फायदा घेण्यासाठी आणि ‘आम्हीही देशभक्त आहोत’ हे दाखविण्यासाठी सत्तापक्षाने ‘तिरंगा’ यात्रेचा आटापिटा केला. भाजप आणि इव्हेंट या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने स्वातंत्र्य दिन, भारताचा राष्ट्रध्वज आणि ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत यांचाही त्यांनी ‘इव्हेंट’ केला. ज्या मंडळींनी कधी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही. लाठ्याकाठ्या खाल्ल्या नाहीत. रक्त सांडले नाही. ज्यांनी स्वातंत्र्यानंतर 50 वर्षे त्यांच्या नागपुरातील मुख्यालयावर तिरंगा ध्वज फडकवला नाही. त्यावरून टोकाची टीका होऊनही ज्यांनी त्याकडे दुर्लक्षच केले, त्यांना यंदा अचानक तिरंगा ध्वजाबद्दल एवढे प्रेम का उतू आले? देशभरात ‘तिरंगा’ यात्रा काढण्याची गरज का भासली? ठिकठिकाणी हातात तिरंगा घेऊन रॅली का काढाव्या लागल्या? तिरंगा ध्वजाचे मोठमोठे बॅनर्स का लावावे लागले? नागपुरातील ‘तिरंगा’ यात्रेत हीच मंडळी तब्बल 700 फुटांचा तिरंगा झेंडा मिरवत होती. किती
भंपकपणा
कराल? तुमचे हे तिरंगा आणि ‘वंदे मातरम्’ प्रेम बेगडी आहे. हजारो-लाखो स्वातंत्र्यसैनिक देशासाठी हाच तिरंगा हातात घेऊन आणि ‘वंदे मातरम्’ गात हसत हसत फासावर गेले. त्या वेळी आताचे हे ‘तिरंगावीर’ बिळात लपून बसले होते. स्वातंत्र्यानंतरही यांना ना कधी तिरंग्याची आठवण आली ना तो फडकवावासा वाटला. आज त्यांना हा सगळा ‘इव्हेंट’ करावा लागला. कारण ‘जंतर मंतर’वरील आंदोलन आणि इतर अनेक कारणांमुळे भाजपवाल्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांच्या देशभक्तीचा बुरखा फाटला आहे. 2014 मध्ये मोदी सरकारची स्थापना म्हणजे देशाच्या खऱ्या स्वातंत्र्याचा सूर्योदय अशा गमजा भाजपवाले आणि मोदीभक्तांनी मारल्या. मात्र आता आपल्या सत्तेचा ‘अस्त’ निश्चित असल्याची जाणीव त्यांना झाली आहे. त्यामुळेच जे फक्त शासकीय ‘कर्तव्य’ म्हणूनच तिरंगा ध्वजारोहण करीत होते, त्यांच्यावर तिरंग्याचे मोठमोठे कटआऊटस् आपल्या फोटोंसह लावण्याची वेळ आली आहे. ज्यांनी स्वातंत्र्यानंतर पाच दशके आपल्या मातृसंस्थेच्या मुख्यालयावर तिरंगा फडकविला नाही, त्यांना लाखो-करोडो रुपये खर्चून ‘तिरंगा’ यात्रेचा इव्हेंट करणे भाग पडले.



































































