
गौरी-गणपती सणाआधी कोकणवासीयांवर नवी टोलधाड पडली असून सिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर उद्यापासून टोलवसुली सुरू केली जाणार आहे. जानवली ते पत्रादेवीपर्यंतच्या अवघ्या 60 किमी अंतरासाठी कार, जीपकडून 125 रुपये तर मिनी बस, बसकडून 425 रुपयांचा टोल आकारला जाणार आहे. महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचा बोजवारा तसेच ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडले असताना हा टोलचा भुर्दंड माथी मारला जात असल्याने भाजप सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाविरोधात वाहनचालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कणकवली तालुक्यातील ओसरगाव टोलनाक्यावर सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून टोलवसुली सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या टोलनाक्यासाठी अवाच्या सवा टोल शुल्क जाहीर करून वाहनचालकांना मोठा धक्का दिला आहे. या टोलवसुलीचे कंत्राट ‘स्कायलाइट इन्फ्रा इंजिनीअर्स’ या कंपनीला देण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम कित्येक वर्षांपासून रखडलेले आहे. या महामार्गाचे काम आधी पूर्ण करा, मगच टोलवसुलीचा धंदा मांडा, अशा संतप्त प्रतिक्रिया वाहनधारकांनी वेळोवेळी नोंदवल्या होत्या. स्थानिकांनीही टोलवसुलीला तीव्र विरोध केला होता. या विरोधाला न जुमानता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नव्या ओसरगाव टोलनाक्याच्या माध्यमातून कोकणवासीय आणि वाहनधारकांच्या खिशावर डल्ला मारला आहे. यापूर्वी मे महिन्यात खारपाडा टोलनाक्यावर टोलवसुली सुरू केली होती. त्यापाठोपाठ ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ओसरगाव टोलनाका सुरू करून सरकारने कोकणवासीयांना मोठा धक्का दिला आहे.
सुकेळीतही टोलवसुलीची तयारी
वाहन टोल
कार, जीप, व्हॅन 125 रुपये
मालवाहू हलकी वाहने 200 रुपये
मिनी बस, बस, ट्रक 425 रुपये
व्यावसायिक वाहने 460 रुपये
अवजड वाहने 665 रुपये
7 व अधिक अॅक्सेलची वाहने 810 रुपये
स्थानिकांवरही टोल
सिंधुदुर्ग जिह्यातील स्थानिकांवरही टोलचा भुर्दंड पडणार आहे. याविरोधात टोलविरोधी कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. समितीने पूर्ण टोलमाफीची मागणी लावून धरली आहे. यापूर्वी हा टोलनाका सुरू करण्याचे तीनदा प्रयत्न करण्यात आले होते. तिन्ही वेळी स्थानिकांनी प्रखर विरोध केल्यामुळे टोलवसुलीचा प्रयत्न फसला होता.




























































