चाकणमधील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी उच्चस्तरीय समिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील चाकण औद्योगिक परिसरातील रस्ते दुरुस्ती आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी पुणे जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय येथील उद्योगांच्या सरकार दरबारी प्रलंबित असलेल्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात ‘उद्योग तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्यात येणार आहे.

चाकण परिसरातील रस्त्यांची झालेली चाळण, सततची वाहतूक काsंडी, ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि कचऱयाचे ढीग याला कंटाळून चाकणमधील 20 कंपन्यांनी स्थलांतर करण्याचा इशारा दिला होता. याची गंभीर दखल घेत राज्य सरकारने उद्योजकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी समिती नेमली आहे. नियोजन विभागाने शुक्रवारी तसा शासन निर्णय जारी केला. या समितीत पोलीस प्रशासनासह पुणे महापालिका, पुणे जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, एमएसआरडीसी, पीएमआरडीए, उद्योग संघटनाच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. पुण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव असतील.

चाकण आणि आसपासच्या औद्योगिक क्षेत्रात उद्योग, व्यावसायिक आस्थापनांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे. लोकसंख्याही वाढत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांवर मोठा ताण आला आहे. या समस्या सोडवण्यासाठी उच्चस्तरीय समिती उपाययोजना करणार आहे. संपूर्ण चाकण परिसराला केंद्रस्थानी ठेवून प्रमुख रस्ते, औद्योगिक क्षेत्रांकडे जाणारे मार्ग, अंतर्गत आणि जोडरस्ते, सेवा रस्ते, चौक, पाणी निचरा व्यवस्था, पथदिवे, वाहतूक सिग्नल, पार्कंग, रस्ता सुरक्षा आणि जड वाहनांच्या वाहतुकीसह सर्व पूरक सुविधांचा एकत्रित आराखडा ही समिती तयार करणार आहे.

10 महिन्यांत अंमलबजावणी

नियोजन, मंजुरी, समन्वय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रक्रिया 10 महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. संबंधित विभागांनी त्यांच्या अखत्यारितील कामांसाठी स्वतंत्र कालबद्ध कृती आराखडा तयार करून त्याची प्रगती उच्चस्तरीय समितीसमोर नियमितपणे सादर करायची आहे.

तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना

प्रमुख रस्त्यांची तातडीने पाहणी करून खड्डे आणि रस्त्यांची दूरवस्था दूर करण्यासाठी आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत. समितीच्या शिफारशीनुसार तातडीची आणि प्राधान्याची कामे संबंधित विभागांनी ‘फास्ट-ट्रक’वर हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासकीय, तांत्रिक आणि अन्य आवश्यक मंजुऱयांमध्ये अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी संबंधित विभागांना निश्चित कालमर्यादेत कार्यवाही करावी लागणार आहे. भविष्यातील औद्योगिक विस्तार आणि वाहतूक वाढीचा विचार करून रस्ते रुंदीकरण, सेवा रस्ते, पाणी निचरा, सार्वजनिक वाहतूक, रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनाचा समावेश असलेला दीर्घकालीन आराखडाही तयार केला जाणार आहे.

आदित्य ठाकरे यांनी केली होती पाहणी

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी पुण्यात जाऊन चाकण येथील रस्त्यांच्या दुरवस्थेची पाहणी केली होती. पाहणीनंतर चाकणच्या औद्योगिक पट्टय़ातील इतरही अनेक समस्या त्यांनी माध्यमांसमोर मांडल्या होत्या.