
पावसाने पोषक वातावरण निर्माण झाल्याने यंदा डाळिंबाचे उत्पादन जोमात आले असून, पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डातील फळबाजारात रविवारी तब्बल १४० ते १५० टन डाळिंबाची आवक झाली. आवक वाढल्याने सध्या डाळिंबाचे घाऊक भाव तुलनेने कमी झाले असून, ग्राहकांना स्वस्तात दर्जेदार डाळिंब खरेदी करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, गणपतीच्या तोंडावर मागणी वाढल्यानंतर दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
मार्केटयार्ड घाऊक बाजारात सध्या ४० ते १३० रुपये किलो या दराने डाळिंबाचा लिलाव होत आहे. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीच्या डाळिंबाची ८० ते २०० रुपये किलो या दराने विक्री केली जात आहे. इंदापूर, बारामती, सांगोला आदी भागांतून मोठ्या प्रमाणात डाळिंब बाजारात दाखल होत आहे.
सध्या डाळिंबाचा हंगाम सुरू असून तो दसर्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे. यंदा डाळिंबाचा हंगाम गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत चांगला असून तब्बल तीन वर्षांनंतर एवढे मोठे पीक तयार झाले आहे. डाळिंबाची लागवड वाढली असून, यंदा पाऊसही व्यवस्थित झाला. डाळिंबासाठी पोषक वातावरण राहिल्याने फळांचा दर्जाही चांगला आहे. दाणे लालभडक आणि रसाळ असल्याने ग्राहकांकडून मागणी वाढत आहे.
डाळिंब आरोग्यासाठी गुणकारी
डाळिंबाच्या दाण्यांमध्ये तंतू, पोटॅशियम, जीवनसत्त्व क, फोलेट तसेच पॉलिफेनॉलसारखे अँटिऑक्सिडंट्स असतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून डाळिंबाचे सेवन केल्याने शरीराला हे विविध पोषक घटक मिळतात. त्यामुळे सध्या दर तुलनेने कमी असताना ग्राहकांनी दर्जेदार डाळिंबाचा आस्वाद घेण्याची ही चांगली संधी आहे.
यंदा तीन वर्षांनंतर एवढे मोठे पीक आले आहे. पाऊस आणि वातावरण डाळिंबासाठी पोषक राहिल्याने दर्जाही उत्तम आहे. सध्या आवक मोठी असल्याने दर कमी आहेत; मात्र गणपती, दसर्याच्या तोंडावर मागणी वाढून दर वाढण्याची शक्यता आहे.
– अतुल जाधव, डाळिंबाचे अडतदार, मार्केटयार्ड.


























































