सामना अग्रलेख – भाजपातील बौद्धिक दुष्काळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
amit shah

ज्या ऐतिहासिक संसदेत भारताचा पहिला स्वातंत्र्य सूर्य उजाडला व ‘वंदे मातरम्’ गायले गेले त्या ऐतिहासिक संसदेस मोदी यांनी टाळे ठोकले आणि गुजरातमधील लग्न समारंभ मंगल कार्यालयाप्रमाणे स्वतःची खासगी संसद इमारत उभारली. हे लोक ‘वंदे मातरम्’ आणि स्वातंत्र्याचे महत्त्व काय जाणणार? माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी परखडपणे सांगितले आहे, ‘वंदे मातरम्’ गीताच्या अनुषंगाने कोणताही वाद असता कामा नये. स्वातंत्र्य संग्रामात काँग्रेसनेही हे गीत गायले आहे. विनाकारण ‘वंदे मातरम्’वर वाद नकोत. मोदी-शहा व त्यांच्या लोकांचे मानसिक आरोग्य ठीक नाही. त्यामुळे ते वैचारिक नक्षलवादाचा संबंध ‘वंदे मातरम्’शी जोडत आहेत. भाजपमध्ये बौद्धिक दुष्काळ पडला आहे. त्यामुळे गिधाडांची फडफड ‘वंदे मातरम्’वर सुरू आहे. ‘वंदे मातरम्’वर वाद हा निर्लज्जपणा आहे.

‘सुंभ जळला तरी पीळ जात नाही,’ अशी अवस्था संपूर्ण भारतीय जनता पक्षाची झाली आहे. ‘जंतर मंतर’वरील ‘पॅलेट गन’ गोळीबारप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन निवेदन करावे, देशाची माफी मागावी या मागणीसाठी काँग्रेससह सर्वच विरोधकांनी संसद बंद पाडली. शहा हे पळून गेले. तेच शहा आता काँग्रेसकडून ‘वंदे मातरम्’चा विरोध हा ‘बौद्धिक नक्षलवाद’ असल्याचे सांगतात व माफी मागण्याची मागणी करतात हा बौद्धिक दुष्काळाचाच प्रकार आहे. स्वातंत्र्य चळवळ, ‘वंदे मातरम्’, ‘इन्कलाब झिंदाबाद’ या राष्ट्रीय घडामोडींशी अमित शहा व त्यांच्या पक्षाचा संबंध कधीच आला नाही. त्यांच्या पक्षाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे मुस्लिम लीगच्या बंगाल मंत्रिमंडळात सहभागी होते व ‘चले जाव’सारख्या स्वातंत्र्य चळवळी कठोरपणे मोडून काढा असे ब्रिटिशांना सांगत होते. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीशी ही बेइमानी केल्याबद्दल भाजपने खरे तर देशाची माफी मागायला हवी, पण शहा यांनी काँग्रेसकडून माफी मागितली आहे. काँग्रेसच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत संपूर्णपणे गाण्यास विरोध झाल्याचा आरोप शहा यांनी केला व हा आरोप करताना ते खोकत होते. बराच काळ लपून राहिल्यामुळे त्यांची घुसमट झाली व त्यांना खोकला लागला. शहा यांनी खोकल्यावर तत्काळ उपचार केले पाहिजेत. मेंदूत व छातीत कचरा साचल्याने श्वास गुदमरतो आणि खोकला सुरू होतो. पुन्हा देशातील वातावरण मोदी-शहांसाठी चांगले नाही. त्याचाही परिणाम प्रकृतीवर होतोच. त्यात ‘वंदे मातरम्’चा वाद त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता जास्त आहे. शहा यांच्या पक्षाच्या मातृ संघटनेने म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पन्नासेक वर्षे आपल्या कार्यालयावर कधीच तिरंगा फडकवला नाही. त्यांच्या शाखाशाखांवर कधीच स्वातंत्र्य दिनाचे सोहळे पार पडले नाहीत. तिरंगे लागले नाहीत. या

पापात शहा-मोदीदेखील सामील

होते. तिरंगा न फडकवण्याचे कारण म्हणजे भारतातून ब्रिटिशांनी जावे ही बहुधा या लोकांची मानसिकता नसावी. महाराष्ट्राचे बोलायचे तर पुण्याच्या शनिवार वाड्यावर बाळाजीपंत नातू यांनी 17 नोव्हेंबर 1817 रोजी इंग्रजांचा युनियन जॅक फडकवला. ब्रिटिश अधिकारी जनरल स्मिथच्या आदेशाने नातू यांनी जरीपटका उतरवला व ब्रिटिशांचा ध्वज फडकवला. ज्यामुळे मराठा साम्राज्याच्या अस्ताची सुरुवात झाली आणि ब्रिटिश राजवटीचा प्रारंभ झाला. नातूसाहेब हे तेव्हाच्या भाजपचे प्रतिनिधी असावेत व त्यांच्यापासूनच श्यामाप्रसाद व त्यांच्या पुढील पिढीने प्रेरणा घेतली असावी. पुढे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यदिनी याच ऐतिहासिक शनिवार वाड्यावर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या हस्ते युनियन जॅक खाली उतरवून तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. नाना पाटील हे डाव्या चळवळीतले स्वातंत्र्यवीर होते व शनिवार वाड्यावर त्या दिवशी ‘वंदे मातरम्’च्या गर्जना झाल्या. पुण्यातील संघ शाखा व कार्यालयांवरही त्या दिवशी तिरंगा फडकला नव्हता. हा इतिहास अमित शहांनी समजून घेतला पाहिजे. ‘वंदे मातरम्’ हे क्रांतिकारकांचे प्रेरणा गीत व भारताचे राष्ट्रगान आहे याचे भान ठेवायला हवे होते. ‘वंदे मातरम्’ची किती कडवी गावीत यावर शहा यांनी संसदेत कायदा केला. तो कायदा मंजूर होत असताना स्वतः शहा हे संसदेत हजर नव्हते. हा ‘वंदे मातरम्’चा अपमान नाही काय? ‘वंदे मातरम्’ची एकूण सहा कडवी आहेत. 1896 च्या कोलकाता येथील काँग्रेस अधिवेशनात सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी ‘वंदे मातरम्’चे गायन केले तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष रहमतुल्लाह सयानी होते. 1906 ते 1910 या काळात ब्रिटिश शासनाने ‘वंदे मातरम्’वर बंदी आणली. ‘वंदे मातरम्’ गाणाऱ्यांना अटका झाल्या. ‘वंदे मातरम्’साठी

तुरुंगात जाणारे काँग्रेसचेच

लोक होते व ‘डावे’ होते. (ज्यांना आज शहा-मोदी ‘बौद्धिक नक्षलवादी’ म्हणत आहेत.) 1937 साली गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पत्र लिहून सल्ला दिला की, संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे गायन करण्यापेक्षा पहिली दोन कडवी (छंद) काँग्रेस वर्किंग  कमिटीने स्वीकारली पाहिजेत व त्यास मान्यता दिली पाहिजे. गुरुदेव टागोर यांच्या सल्ल्यानुसार काँग्रेस वर्किंग कमिटीने सर्वसंमतीने प्रस्ताव मंजूर करून ‘वंदे मातरम्’चे पहिले दोन छंद स्वीकारले. या कमिटीत महात्मा गांधी, सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, गोविंद वल्लभ पंत, आचार्य कृपलानी यांच्यासारखे महान लोक होते. 14-15 ऑगस्टच्या मध्यरात्री भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून साजरा केला. पंडित नेहरूंच्या ‘Trust with Destiny’ या ऐतिहासिक भाषणाआधी सुचेता कृपलानी यांनी ‘वंदे मातरम्’चे गान केले तेव्हा संसद रोमांचित झाली होती. ज्या ऐतिहासिक संसदेत भारताचा पहिला स्वातंत्र्य सूर्य उजाडला व ‘वंदे मातरम्’ गायले गेले त्या ऐतिहासिक संसदेस मोदी यांनी टाळे ठोकले आणि गुजरातमधील लग्न समारंभ मंगल कार्यालयाप्रमाणे स्वतःची खासगी संसद इमारत उभारली. हे लोक ‘वंदे मातरम्’ आणि स्वातंत्र्याचे महत्त्व काय जाणणार? वाद पेटवायचे व त्यावर स्वतःच्या भाकऱ्या शेकायच्या हेच यांचे धंदे. माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी परखडपणे सांगितले आहे, ‘वंदे मातरम्’ गीताच्या अनुषंगाने कोणताही वाद असता कामा नये. स्वातंत्र्य संग्रामात काँग्रेसनेही हे गीत गायले आहे. विनाकारण ‘वंदे मातरम्’वर वाद नकोत. मोदी-शहा व त्यांच्या लोकांचे मानसिक आरोग्य ठीक नाही. त्यामुळे ते वैचारिक नक्षलवादाचा संबंध ‘वंदे मातरम्’शी जोडत आहेत. भाजपमध्ये बौद्धिक दुष्काळ पडला आहे. त्यामुळे गिधाडांची फडफड ‘वंदे मातरम्’वर सुरू आहे. ‘वंदे मातरम्’वर वाद हा निर्लज्जपणा आहे.