
गणराया, यंदा तरी कोकणचा प्रवास सुखाचा होऊ दे… खड्ड्यांपासून मुक्ती दे, अशी आर्त विनवणी करीत लाखो मुंबई-ठाणेकर कोकणवासीयांनी विघ्नहर्त्याच्या चरणी साकडे घातले. पण मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांची सद्यस्थिती पाहता विघ्नहर्त्यानेही महायुती सरकारपुढे हात टेकले, अशी उपरोधिक संतप्त प्रतिक्रिया कोकणवासीयांमधून उमटली आहे. वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाडपासून ते थेट संगमेश्वर, लांजा, राजापूरपर्यंत पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे मणक्याला दणके खातच कोकण गाठावे लागणार आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदा तरी खड्डेमुक्त, सुखाचा प्रवास करायला मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र महायुती सरकारच्या आश्वासनांच्या पुडय़ा आणि ठेकेदारांचा बेफिकीर कारभार यामुळे त्यांच्या अपेक्षांवर अक्षरशः पाणी फिरले आहे. वडखळ ते राजापूर अनेक ठिकाणी इतके मोठे खड्डे पडले आहेत की, रस्ता कुठे आणि खड्डा कुठे हेच वाहनचालकांना कळेनासे झाले आहे. दुचाकीस्वार तर प्रत्येक खड्डय़ापूर्वी देवाचे नाव घेऊनच पुढे जात आहेत. या खड्ड्यांमुळे बसणाऱ्या दणक्यांनी यंदाही कोकणवासीयांची हाडे खिळखिळी होणार आहेत.
सर्व्हिस रोडमुळे पोटात गोळे
वडखळ ते महाड अनेक ठिकाणी रस्त्यांचे चौपदरीकरण झाले; परंतु ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामामुळे या रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. नागोठणे येथील उड्डाणपुलाला तर मधोमध भेगच पडली होती. त्यावर आता थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. वडखळ, इंदापूर, महाड, कोलाड, लोणेरे आणि नागोठणे येथील महामार्गांवरील सर्व्हिस रोड जीवघेणे ठरत आहेत. या सर्व्हिस रोडवर दोन ते चार फूट लांब आणि आठ ते दहा इंच खोल खड्डे पडले आहेत. पावसामुळे खड्डय़ात पाणी साचत असल्याने त्याची खोली वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे बसणाऱ्या गचक्यांमुळे प्रवाशांच्या पोटात अक्षरशः गोळे आणि अंगावर काटा येतो, अशी प्रतिक्रिया गिरगावातील मालवणवासी प्रसाद म्हापणकर यांनी व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर चौपटीने वाहतूक वाढणार असल्याने या खड्ड्यांमुळे मोठय़ा वाहतूककोंडीला चाकरमान्यांना तोंड द्यावे लागणार आहे.
रत्नागिरी जिह्यातही अर्धवट रस्ते, खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य
लांजा ते नेवाळी या मार्गावर अक्षरशः चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. चिपळूण, संगमेश्वर, नेवाळी आणि लांजा येथील उड्डाणपूल रखडले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडवरूनच चाकरमान्यांना यंदाही प्रवास करावा लागणार आहे. या सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे आणि चिखलाचा राडारोडा असल्याने खड्ड्यांचे दणके आणि तासन्तासाची वाहतूक कोंडी असा दुहेरी ताप चाकरमान्यांना सहन करावा लागणार आहे. लांजा ते राजापूर या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. हातखंबा ते पाली या मार्गावरही अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने आम्हाला गावात सुखरूप पोहोचव रे गणराया, असे साकडेच या मार्गावरून जाणाऱ्या चाकरमान्यांनी घातले आहे.
हे खड्डेदर्शन आणखी किती काळ सहन करणार?
यंदाचा आमचा वरसलीचा (वर्षातला सण) प्रवासही मुंबई ते कोकण व्हाया खड्डे असाच होणार आहे. गणरायाच्या दर्शनापूर्वी महामार्गावरील खड्ड्यांचे दर्शन आधी घ्यावे लागणार आहे. हा जीव मेटाकुटीला आणणारा खड्डेदर्शन सोहळा चाकरमान्यांनी आणखी किती काळ सहन करायचा, असा संतप्त सवाल देवगड येथील भांडुपवासी चाकरमानी जयवंत मालणकर यांनी व्यक्त केला.
माणगाव बायपास यंदा तरी खुला होणार का?
माणगाव शहरातून जाणारा मुंबई-गोवा महामार्ग अत्यंत अरुंद असल्याने या रस्त्यावर रोजच एक ते दीड तासांचा टॅफिक जाम होतो. गणेशोत्सव काळात तर ही वाहतूककोंडी सात ते आठ किमीपर्यंत जाते. दरवर्षी हा ताप सहन करावा लागतो. त्यासाठी माणगाव बायपास बनवण्यात आला आहे. मात्र या बायपासलाही दरवर्षी तारीख पे तारीख मिळत असल्याने यंदा तरी तो गणेशोत्सवापूर्वी खुला होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. हा बायपास सुरू करण्यास विलंब झाला तर माणगावात यंदा विक्रमी वाहतूककोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.





























































