प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी गजाआड, सोशल मीडियावर करायचे जाहिरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंजिनीअर प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी कारवाई करून दहा जणांना अटक केली. या टोळीविरोधात मुंबई, नागपूर, गुजरात, उत्तर प्रदेश येथे गुन्हे दाखल आहेत. सोशल मीडियावरून बनावट जाहिरात करून ही टोळी पुण्यातील कॉल सेंटरच्या मदतीने फसवणूक करत होती अशी त्याची गुन्ह्याची पद्धत होती.

तक्रारदार महिलेला तिच्या मुलासाठी हैदराबादच्या आयआयटीमध्ये प्रवेश हवा होता. त्या दरम्यान महिलेला सोशल मीडियावर एक जाहिरात दिसली. इंजिनीअर कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल असे भासवण्यात आले. त्यानंतर प्रवेशाच्या नावाखाली ठगाने तिच्याकडून साडेसोळा लाख रुपये घेतले. पैसे घेऊन प्रवेश दिला नाही. महिलेने प्रवेशाबाबत संपर्क केला असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक सुशांत बंडगर, जयदीप गोसावी, उपनिरीक्षक प्रशांत केंद्रे, जाधव, पिसाळ, घाडगे, राठोड, शिरसाठ, येवले यांच्या पथकाने या प्रकरणात तपास केला.

अटक आरोपी हे उच्चशिक्षित असून ते बिहार, हरियाणा, उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत.
सिम कार्डचा वापर केवळ फसवणुकीसाठी करत होते.
आरोपीने पुण्यातील, नोएडा, बँगलोर येथील महाविद्यालयातून शिक्षण घेतले.
२०१९पासून ही टोळी कॉल सेंटरमधून फसवणूक करायची.

अशी करतात फसवणूक

इंजिनीअरिंग प्रवेशासाठी सोशल मीडियावर जाहिरात करून पालक आणि विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करतात. बनावट सिम कार्डच्या माध्यमातून संपर्क करून त्यांना हव्या त्या शिक्षण संस्थेत प्रवेश देऊ अशा भूलथापा मारतात. ठग हे पालकांकडून आगाऊ रक्कम घेत होते. त्यांना विविध बँक खात्यांचे तपशील पाठवले जात होते. पैसे मिळताच ते संपर्क करणे बंद करतात. कॉल सेंटरचे चालक विविध बनावट सिम कार्ड त्यांनी नेमलेल्या डीलरकडून घेत असायचे.