एकीकडे राज्यातील उद्योग बंद पडत असताना दुसरीकडे खर्डीतील ‘रुरल गॉस्पेल अँड मेडिकल मिशन ऑफ इंडिया’ या अमेरिकास्थित कंपनीने ३ कामगारांना पगार, फंड न देताच कामावरून काढले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंपनीच्या प्रभारी व्यवस्थापकांनी ३ कामगारांना थातूरमातूर कारण देत कामावर येऊ नका, असे सांगितल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तब्बल ३० वर्षांच्या सेवेची किंमत कंपनी प्रशासनाने शून्य केल्याने मुजोरीविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रुरल गॉस्पेल अँड मेडिकल मिशन ऑफ इंडिया’ या कंपनीने खर्डी येथील आपले कार्यालय १ ऑगस्टपासून बंद केले आहे. या कंपनीत गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत असलेल्या राजेश कसबे, शारलेट कसबे, विलासिनी जाधव या कर्मचाऱ्यांना प्रभारी व्यवस्थापकांनी ‘परदेशी निधी येत नाही’ असे तोंडी कारण देत कामावर येऊ नका असे सांगितले. दरम्यान, कायमस्वरूपी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या ३० वर्षांच्या सेवेचा फंड, ग्रॅच्युइटी व वेतन न देता कामावरून कमी करण्यात आले आहे. याप्रकरणी कर्मचाऱ्यांकडून कंपनी प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कंपनीकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही.
आत्मदहन करण्याचा इशारा
अखेर या संतप्त तीन कर्मचाऱ्यांनी या कंपनीच्या नाशिक येथील कार्यालयासमोर २४ ऑगस्टला आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नाशिक पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले आहे. दरम्यान, कंपनीच्या सेवा करारातील अटी व शर्तीनुसार थकीत पगार व सेवेचा फंड तत्काळ द्यावा तसेच संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी व कामावरून कमी करण्याचे लेखी कारण द्यावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे.
शहापूर तालुक्यातील खर्डी, दळखण, उबरखंड व काष्टी येथे ७० एकर जमीन असून दान केलेल्या या जमिनीचा व्यवहार कंपनी प्रशासनाने सुरू केला आहे. त्यामधून करोडो रुपये कमावण्याचा घाट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घातला असल्याचा आरोप कामगारांनी निवेदनात केला आहे.




























































