
जम्मू-कश्मीरच्या रियासी जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा भीषण अपघातात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कारमधील कुटुंब थानोलेहून थुब गावाकडे चालले होते. रियासी जिल्ह्यातील पनासा गावाजवळ डोंगराळ रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शोधमोहीम सुरू केली. पोलिसांनी तीन जणांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
प्रेम सिंग (50), तुरी देवी (45) आणि दुर्गा देवी (70) अशी मृतांची नावे आहेत. गाडी दरीत कोसळण्यापूर्वी इतर दोन प्रवाशांनी गाडीतून उडी मारली, ज्यात ते जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

























































