
तेलंगणात पैशांसाठी दहावीत शिकणाऱ्या दोन मुलांनी त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापिकेची 27 वेळा सुरा खुपसून निर्घृणपणे हत्या केली. कल्लु रुपा रेड्डी असे त्या महिलेचे नाव असून त्या कोडामलेपल्ली येथील नागार्जुन पब्लिक स्कूलमध्ये मुख्याध्यापिका होत्या. या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये भरपूर पैसे सापडल्यानंतर रुपा रेड्डी यांनी या दोन्ही मुलांच्या पालकांना त्या विषयी कळवले होते. त्यानंतर त्यांना पालकांचा ओरडा मिळाला होता. त्याचा राग या मुलांच्या मनात होताच. 12 ऑगस्टच्या रात्री रुपा रेड्डी यांचे पती घरात नसताना हे दोन्ही विद्यार्थी त्यांच्या घरात घुसले त्यानंतर त्यांनी घरातले दीड लाख रुपये चोरले. त्याचवेळी रुपा यांनी त्यातील एकाला बघितले. त्यानंतर त्याने रुपा यांच्यावर हातातील चाकूने हल्ला केला व त्यांची हत्या केली.
हत्येनंतर गोव्यात केली पार्टी
शिक्षिकेची हत्या केल्यानंतर ही दोन्ही मुलं गोवा फिरायला गेली होती. तिथे त्यांनी पार्टी केली व पैसे उडवले.
बाबू शब्दावरून झाला खुलासा
रुपा यांच्या फोन रेकॉर्डिंगमध्ये त्यांची हत्या झाली त्या रात्रीच्या शेवटच्या कॉलमध्ये शेवटचा शब्द हे बाबू होता. त्यावरून त्यांनी शोध सुरू केला. शाळेत तपास केल्यानंतर त्यांना बाबू नावाने हा हाक मारल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगळं केलं. त्यातील एक विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून भरपूर पैसे उधळत असल्याचे इतरांकडून कळाले तेव्हा पोलिसांनी त्याची चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्याने व त्याच्या मित्राने मिळून मुख्यध्यापिकेची हत्या केल्याचे कबूल केले.



























































