
पाच लाखांच्या मदतीसाठी वसईतील एका ६६ वर्षीय वृद्धेने १२ लाख रुपये गमावले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सायबर भामट्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती गरीबांना आर्थिक मदत करीत असल्याचे भासवणारी एक बनावट व्हिडीओ क्लिप या महिलेला पाठवली आणि तिची फसवणूक केली.
वसई पूर्व परिसरात राहणाऱ्या तक्रारदार महिलेला २७ जुलै रोजी इन्स्टाग्रामवर तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांची एक ‘रिल’ दिसली. या व्हिडीओमध्ये गरजू आणि गरीब नागरिकांना आर्थिक मदत केली जात असल्याचे सांगून मदत हवी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. महिलेने आपल्याला पाच लाख रुपयांची मदत हवी असल्याचे सांगितले. त्यानंतर भामट्यांनी प्रोसेसिंग फी म्हणून तिच्याकडून पाच हजार घेतले आणि तब्बल ७७ लाख रुपयांची मदत मिळणार असल्याचे आमिष दाखवले. त्यासाठी कर आणि शुल्क भरण्याच्या नावाखाली तिच्याकडून १२ लाख उकळले.
पतसंस्थेत कर्ज घेतले
आरोपींच्या भूलथापांना बळी पडलेल्या महिलेने खासगी पतसंस्थेतून कर्ज घेतले, आपले दागिने गहाण ठेवले तसेच मुलीच्या बँक खात्यातूनही पैसे काढले. अशा प्रकारे अवघ्या दहा दिवसांत महिलेने आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांमध्ये एकूण १२ लाख रुपये जमा केले.





























































