Jalna News – जालन्यात शस्त्रास्त्रांसह तिघे जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 58 हजारांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यात बेकायदेशीर शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नांना स्थानिक गुन्हे शाखेने चांगलाच लगाम घातला आहे. पोलिसांनी सलग कारवाया करत एक गावठी पिस्तुल, एक देशी रिव्हॉल्व्हर आणि दोन धारदार तलवारींसह तीन आरोपींना जेरबंद केले. या कारवाईत तब्बल 58 हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

पहिली कारवाई जालना तालुक्यातील खरपुडी येथे झाली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी खरपुडी येथे गुरुवारी छापा टाकत प्रथमेश बालाजी कदम या तरुणाला ताब्यात घेतले. प्रथमेशकडून 35 हजार रुपये किमतीची एक गावठी पिस्तुल जप्त केली. दुसरी कारवाई जालना शहरातील बसस्थानक परिसरात झाली. राजेश दीपक पांजगे नामक तरुण देशी रिव्हॉल्व्हर घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बसस्थानकासमोरील रस्त्यावर सापळा रचला. पोलिसांनी पांजगेला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 20 हजार रुपये किमतीचे देशी रिव्हॉल्व्हर जप्त केले.

तिसऱ्या कारवाईत पवन बबन कसबे याच्याकडे धारदार तलवारी असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. पथकाने त्याला ख्रिस्ती कॅम्प परिसरातून ताब्यात घेतले आणि त्याच्या राहत्या घराची झडती घेतली. यावेळी त्याच्या घरातून तीन हजार रुपये किमतीच्या दोन तीक्ष्ण तलवारी हस्तगत करण्यात आल्या. या तिन्ही कारवायांमध्ये मिळून पोलिसांनी 58 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.