
‘पीएम केअर्स फंड’च्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या ऑडिट अहवालाचा संदर्भ देत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. “देणगी चोरीसाठी एक श्री राम मंदिर ट्रस्ट पुरेसा नव्हता का?” असा खोचक सवाल विचारत, खरगे यांनी या फंडाच्या पारदर्शकतेवर आणि खर्चावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
X वर पोस्ट करत मल्लिकार्जुन खरगे यांनी या फंडाच्या आर्थिक ताळेबंदाचा संदर्भ दिला. खरगे यांनी म्हटले आहे की, २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस या फंडात तब्बल ८,४५२ कोटी रुपये शिल्लक आहेत. मात्र संपूर्ण वर्षात या निधीतून केवळ ८७.८५ लाख रुपये खर्च करण्यात आले, जे एकूण शिल्लक निधीच्या अवघे ०.०१ टक्के आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी उभारण्यात आलेल्या निधीमध्ये हजारो कोटी रुपये जमा करून ठेवण्याचे काय औचित्य आहे, जेव्हा त्यातील नगण्य भागच खर्च केला जात आहे, असा सवाल त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना खरगे म्हणाले की, पीएम केअर्स फंड आणि राम मंदिर ट्रस्ट या दोन्हीची घोषणा मोदींच्या देखरेखीखाली झाली असून या दोन्ही संस्थांना त्यांच्या नेतृत्वाखालीच देणग्या मिळतात. पब्लिक अथॉरिटी विदाऊट पब्लिक अकाउंटेबिलिटी, अशी या फंडाची अवस्था झाली आहे. पंतप्रधानांचे नाव असलेल्या या फंडाला माहितीचा अधिकार), कॅगचे ऑडिट आणि संसदेच्या उत्तरदायित्वापासून पूर्णपणे बाहेर का ठेवण्यात आले आहे, असा जाबही त्यांनी विचारला.
स्वतः पंतप्रधान या फंडाचे अध्यक्ष आहेत, तर संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री याचे ट्रस्टी आहेत. या फंडाला सीएसआर निधी आणि करमुक्त देणग्या स्वीकारण्याची परवानगी असतानाही तो सार्वजनिक तपासणीच्या कक्षेत का येत नाही, देशात विविध आपत्कालीन परिस्थिती उद्भवत असताना हजारो कोटी रुपये बँकेत ठेवून त्यावर केवळ व्याज कमवणे हाच या फंडाचा उद्देश आहे का, असे अनेक सवाल खरगे यांनी उपस्थित केले.


























































