
राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी)नेते तेजस्वी यादव यांनी गुरुवारी कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून बिहारमधील सत्ताधारी भाजपप्रणीत सरकारवर टीका केली. तसेच आपण बिहारला ‘पोलीस राज’ बनू देणार नाही, असे ठामपणे सांगितले.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या यादव यांनी बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे सांगितले. तसेच वाढत्या पोलीस अत्याचारांवर नियंत्रण मिळवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला. आरजेडीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षांनी १९ वर्षीय रोशन यादवच्या कुटुंबीयांची भेट घेतली. रोशन यादव १० ऑगस्ट रोजी मधुबनी कारागृहात फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.कारागृह प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, रोशन यादवने १० ऑगस्ट रोजी कारागृहात आत्महत्या केली. मात्र, तेजस्वी यांनी पोलिसांच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्याच्या शरीरावर आढळलेल्या अनेक खुणांकडे लक्ष वेधत त्याची हत्या झाली असावी, असा आरोप केला.
शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत (आर्म्स ॲक्ट) दाखल असलेल्या एका प्रकरणात हा १९ तरुण २७ मेपासून कारागृहात होता. नंतर त्याची सुटका झाली, पण त्यानंतर लगेचच त्याला पुन्हा अटक करण्यात आली. या मुलाला निर्दयपणे मारहाण करण्यात आली आणि त्याला विजेचे धक्के देण्यात आले. हे पोलिसांचे अमानवीय कृत्य आहे. आम्ही बिहारला ‘पोलीस राज’ बनू देणार नाही,” असे तेजस्वी यादव म्हणाले.


























































