महात्मा गांधींच्या हस्तलिखिताला लिलावात तब्बल १६.२ कोटींची विक्रमी बोली, हिंदुस्थानी ऐतिहासिक दस्तऐवजाचा जागतिक विक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वाक्षरीने युक्त असलेल्या ६८८ हस्तलिखित सुविचारांच्या आणि विचारांच्या दुर्मिळ संग्रहाचा लिलाव तब्बल १६.२ कोटी रुपयांना झाला आहे. The Times of India च्या वृत्तानुसार, सॅफ्रॉनआर्ट या नामांकित संस्थेने आयोजित केलेल्या या लिलावात हिंदुस्थानी ऐतिहासिक दस्तऐवजाच्या विक्रीचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित झाला आहे.

हे हस्तलिखित महात्मा गांधींनी त्यांचे निकटवर्तीय, स्वातंत्र्यसैनिक आणि प्रकाशक आनंद टी. हिंगोराणी यांच्यासाठी २३ महिन्यांच्या कालावधीत लिहिले होते. हिंगोराणी यांच्या पत्नी विद्या यांच्या निधनानंतर बापू त्यांना मानसिक बळ आणि मार्गदर्शन देण्यासाठी दररोज हे हस्तलिखित विचार लिहून देत असत. पुढे याच हस्तलिखिताचे संकलन ‘अ थॉट फॉर द डे’ (A Thought of the Day) या पुस्तकात करण्यात आले. या हस्तलिखितात सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अस्पृश्यता निवारण, सेवा, श्रम, स्वराज, ईश्वराचा शोध आणि नैतिक जबाबदारी यांसारख्या विविध पैलूंवर बापूंचे सखोल विचार नोंदवले गेले आहेत.

‘गांधी: फ्रॉम द कलेक्शन ऑफ आनंद टी. हिंगोराणी’ या शीर्षकाखाली आयोजित या लिलावात एकूण ८६ दुर्मिळ वस्तू, पत्रे आणि हस्तलिखिते मांडण्यात आली होती. त्यामध्ये ‘लॉट ८०’ क्रमांकावर असलेले हे हस्तलिखित सर्वाधिक बोली मिळवणारे ठरले. खरेदीदाराची ओळख जाहीर करण्यात आलेली नसली, तरी खरेदीदार हिंदुस्थानातील असून हे ऐतिहासिक दस्तऐवज देशातच राहणार असल्याचे लिलाव संस्थेने म्हटले आहे.