
सीटवरून झालेल्या वादातून दिव्यांग व्यक्तीला धावत्या लोकलमधून बाहेर ढकलल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दिव्यांग प्रवाशाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. चर्चगेट-बोरीवली लोकमध्ये गुरुवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला घेतले आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ही व्यक्ती दिव्यांगजन डब्यातून प्रवास करत असताना बसण्याच्या जागेवरून आरोपीसोबत त्याचे भांडण झाले. हा वाद विकोपाला जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यादरम्यान माहिम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान आरोपीने 62 वर्षीय दिव्यांग व्यक्तीला ट्रेनमधून बाहेर ढकलले.
चालत्या ट्रेनमधून खाली पडल्यामुळे संबंधित व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला तात्काळ भाभा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अमजद सफरुद्दीन शेख (48) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
चौकशीदरम्यान, आरोपी शेखने घटनेबाबत विचित्र खुलासा केल्याचे समजते. डब्यात एक कावळा शिरला होता. तो त्या कावळ्याला हाकलण्याचा प्रयत्न करत असताना चुकून त्या व्यक्तीला धक्का लागला आणि तो ट्रेनमधून खाली पडला, असा दावा आरोपीने पोलीस चौकशीत केला आहे.



























































