आम्ही हिंदुस्थानी आहोत, आम्हाला चिनी म्हणू नका; अरुणाचलच्या चिमुरडीचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्वोत्तर हिंदुस्थानातील नागरिकांवर होणाऱ्या वांशिक शेरेबाजीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अरुणाचल प्रदेशमधील एका चिमुरडीचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, यामध्ये तिने देशातील लोकांना ईशान्येकडील नागरिकांना चिनी न संबोधण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.

सुमारे ५६ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये या लहान मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग मांडला आहे. एका व्यक्तीने तिला “तू चिनी आहेस का?” असा प्रश्न विचारल्यानंतर ती व्यथित झाली. यावर उत्तर देताना तिने अत्यंत निरागस आणि ठाम शब्दांत आपली भावना व्यक्त केली. “जेव्हा लोक आम्हाला चिनी म्हणतात, तेव्हा मला खूप वाईट वाटते आणि रागही येतो. आम्ही हिंदुस्थानी आहोत, आम्हाला चिनी म्हणू नका. आम्ही हिंदुस्थानात राहतो, इटानगरमध्ये राहतो. कृपया असे बोलू नका,” असे हात जोडून तिने सांगितले.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया युजर्सकडून या चिमुरडीला मोठा पाठिंबा मिळत आहे. केवळ रूपावरून ईशान्य हिंदुस्थानातील नागरिकांना परदेशी समजण्याची मानसिकता चुकीची असून हिंदुस्थानची खरी ताकद त्याच्या विविधतेत आहे, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.