
दिल्लीच्या करोल बाग भागात पार्क केलेल्या कारमधून 2 कोटी रुपयांचे सोने आणि हिऱ्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली. जयपूरमधील एका सराफाच्या कारमध्ये ही चोरी झाली. माहिती मिळताच करोल बाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, जयपूरस्थित सराफ आणि एसकेजी कुंदन क्राफ्ट्सचे मालक कन्हैया लाल हे मुलगा ध्रुव सोनी आणि एका कर्मचाऱ्यासोबत मार्केटिंगच्या कामासाठी 19 ऑगस्ट रोजी दिल्लीला आले होते. लाल यांच्या कारमध्ये तीन बॅकपॅक आणि एक सुटकेस होती. बॅकपॅकमध्ये सोने,हिऱ्यांचे दागिने आणि लॅपटॉप होता, तर सुटकेसमध्ये कपडे होते.
लाल यांनी ग्रेटर कैलास भागातील अनेक दागिने विक्रेत्यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते करोल बागला पोहोचले, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांनी आर्य समाज रोडवर कार पार्क केली. त्यानंतर ते बॅगा कारमध्येच ठेवून जवळच असलेल्या बिकानेरवाला रेस्टॉरंटमध्ये गेले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
सायंकाळी सव्वासात वाजता ते परत आले तेव्हा त्यांना कारची मागील खिडकी फोडलेली आढळली आणि बॅकपॅक व सुटकेस गायब असल्याचे दिसून आले. लाल यांनी करोल बाग पोलिसात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. चोरीला गेलेले दागिने हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

























































