
लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याला भेट दिली. जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान पेलेट गनच्या वापरासंदर्भात माहिती घेण्यासाठी ते डीसीपींच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी राहुल गांधी यांनी एफआयआर नोंदवण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले आणि गुन्हा दाखल होईपर्यंत तेथून न जाण्याचा निर्धार व्यक्त केला.
अखेर राहुल गांधी यांच्या धरणे आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी पेलेट गन प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ११८ आणि १२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ११८ हे धोकादायक शस्त्र किंवा उपकरणाने हेतुपुरस्सर दुखापत किंवा गंभीर दुखापत करण्याशी संबंधित आहे. तर कलम १२५ हे इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांशी संबंधित आहे.
राहुल गांधी म्हणाले की, हे न्यायाच्या दिशेने पहिले पाऊल आहे.पेलेट गन प्रकरणात एफआयआर दाखल होणे हे न्यायाच्या दिशेने पहिले पाऊल आहे. त्या तरुणाला गोळी लागून एक महिना झाला आहे आणि त्याच्या शरीरात अजूनही पेलेट्स अडकलेले आहेत. राहुल यांच्या म्हणण्यानुसार, त्या तरुणाच्या डोळ्यात तीन गोळ्या लागल्या आहेत, ज्यामुळे त्याला दिसत नाही, तर तीन-चार गोळ्या त्याच्या हृदयाजवळ आहेत. राहुल गांधी म्हणाले की, त्या तरुणावर गंभीर अन्याय झाला आहे आणि एफआयआर दाखल करण्यासाठी त्याला सुमारे आठ तास थांबावे लागले. साहिल लोचाब यांच्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडण्याचा आदेश कोणी दिला, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला होता. अमित शाह आणि दिल्ली पोलिसांनी यासाठी जबाबदार ठरवावे, असे पक्षाने म्हटले होते. साहिल आणि त्याची आई वारंवार एफआयआर दाखल करण्याची मागणी करत होते, परंतु पोलीस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला होता.




























































