
विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामासाठी रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यानच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर आणि हार्बर लाईनवरील कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
घाटकोपर येथून सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ व भायखळा स्थानकांवर थांबतील.
हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 दरम्यान सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर लाईनवरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.17 ते दुपारी 3.47 दरम्यान सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेल – वाशी – पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.हार्बर लाईनवरील प्रवाशांना ब्लॉकच्या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांद्वारे प्रवास करण्याची परवानगी असेल.
बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान पश्चिम रेल्वेचा जंबो ब्लॉक
ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी शनिवारी मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान जंबो ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी मध्यरात्री 00.30 ते पहाटे 4.30 या वेळेत अप आणि डाउन स्लो लाईन्सवर 4 तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकच्या कालावधीत, विरार/वसई रोड आणि बोरिवली/गोरेगाव दरम्यान सर्व अप स्लो लाईनच्या गाड्या अप फास्ट लाईनवर धावतील. त्याचप्रमाणे, विरारकडे जाणाऱ्या सर्व डाउन स्लो लाईनच्या गाड्या गोरेगाव आणि वसई रोड/विरार दरम्यान डाउन फास्ट लाईनवर धावतील. रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.


























































