हल्ली सगळ्यांनाच मधुमेह आहे, साखर महाग झाल्याप्रकरणी बिहारच्या मंत्र्यांचे अजब विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या आठवडाभरात साखरेच्या दरात झालेल्या वाढीवरून बिहारमध्ये राजकीय वाद निर्माण झाला आहे. साखरेच्या वाढत्या किमतींचा सर्वसामान्यांवर फारसा परिणाम होणार नाही, कारण मधुमेह आणि मधुमेहपूर्व स्थिती असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने लोकांनी गोड पदार्थ खाणे कमी केले आहे, असा दावा बिहारचे ग्रामीण विकासमंत्री श्रवण कुमार यांनी केला.

सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित एनडीए सरकारमध्ये जनता दल युनायटेडच्या कोट्यातून मंत्री असलेल्या श्रवण कुमार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले. “मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने लोक गोड पदार्थ खात नाहीत. ते कमी गोड खातात. प्रत्येकालाच मधुमेह असल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे साखरेच्या किमती वाढल्याने फारसा फरक पडेल, असे मला वाटत नाही,” असे ते म्हणाले.

मंत्र्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले. विरोधी राष्ट्रीय जनता दलानेही या वक्तव्यावरून श्रवण कुमार यांच्यावर जोरदार टीका केली.

आरजेडीचे राज्य प्रवक्ते एजाज अहमद यांनी व्हिडीओ संदेशातून मंत्र्यांवर निशाणा साधला. “साखरेच्या वाढत्या किमतीचा फटका त्या सामान्य नागरिकांना बसला आहे, ज्यांच्या दिवसाची सुरुवात एका कप चहाने होते किंवा जे चहासोबत ब्रेड अथवा बिस्किट खातात,” असे अहमद म्हणाले.

श्रवण कुमार हे मंत्री असल्याने त्यांना साखरेच्या वाढलेल्या किमतीचा त्रास जाणवत नसेल, मात्र सर्वसामान्यांच्या अडचणींबाबत त्यांनी असंवेदनशील वक्तव्य केल्याचा आरोप अहमद यांनी केला. साखरेच्या किमती वाढण्यामागे केंद्र सरकारची चुकीची धोरणे असल्याचा दावाही त्यांनी केला.

पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या निर्मितीसाठी उसाचा वापर केला जात असल्यामुळे साखरेच्या उपलब्धतेवर आणि किमतीवर परिणाम होत असल्याचे अहमद यांनी म्हटले. याच मुद्द्यावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. मोदी यांनी अनेकदा आपल्या संघर्षाची कहाणी सांगताना चहा विकल्याचा उल्लेख केला आहे, याची आठवण करून देत अहमद यांनी त्यांच्यावर उपरोधिक टीका केली.