
मुंबईच्या पवई परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. तृतीयपंथी बनून आलेल्या पुरूषाने नजर काढण्याचा बहाणा करत फ्लॅटमध्ये घुसून एअर हॉस्टेसवर बलात्कार केला. महिलेने आरडाओरडा करताच आरोपी 2 हजार रुपये घेऊन फरार झाला. महिलेच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा कसून शोध घेतला. पोलिसांनी कळवा येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. अनिल शिंदे असे आरोपीचे नाव आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अनिल शिंदे हा तृतीयपंथी पुरुषाचा वेश धारण करून साडी नेसून 19 ऑगस्ट रोजी पवईतील एका सोसायटीत घुसला. त्याने सुरक्षा रक्षकाचा विश्वास संपादन केला आणि अनेक दरवाजे ठोठावत इमारतीत प्रवेश केला. याचदरम्यान, तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या पीडितेने दरवाजा उघडला. अनिलने पीडितेच्या आजारी पतीला बरे करण्याचे आणि दृष्ट काढण्याचे वचन देऊन घरात प्रवेश मिळवला. आत आल्यावर पीडितेवर पाणी शिंपडत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर 2 हजार रुपये घेऊन तो फरार झाला.
पीडितेने पवई पोलिसात एफआयआर दाखल केला. पीडितेच्या तक्रारीनंतर, पवई पोलिसांनी इमारतीमधील आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका फुटेजमध्ये, आरोपी साडी नेसून ठाण्यातील खारेगावच्या झोपडपट्टीच्या दिशेने ऑटो रिक्षातून पळून जाताना दिसला. पोलिसांनी ऑटोच्या नोंदणी क्रमांकावरून चालकाचा शोध घेतला आणि आरोपी कुठे उतरला याची माहिती मिळवली. त्यानंतर, त्यांनी त्याला कळवा येथे अटक केली.
आरोपी अनिल शिंदे याच्या कुटुंबात हिजडे आणि भिकारी म्हणून भीक मागण्याची परंपरा आहे आणि त्याने यापूर्वीही अशाच वेशात गुन्हे केले आहेत. आरोपीवर बलात्कार आणि गुन्हेगारी धमकीसह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असून सध्या त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.




























































