
>> श्रीकांत आंब्रे
महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रात मे 2026 पासून सुरू केलेल्या आरोग्यघातक पदार्थांवरील धाडसत्रामुळे घरोघरी ते चर्चेचा विषय ठरले. त्यांच्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग्ज, सेफ महाराष्ट्र’ या विधायक मोहिमेमुळे सामान्य जनतेला त्यांच्या रूपाने देवदूतच भेटल्याची जाणीव झाली. त्यांच्या धाडसी धाडसत्रामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या समाजविघातक शक्तींना जबरदस्त धक्का आणि दहशत बसली. अनेकांना तुरुंगाची वा खावी लागली तर कित्येकांवर खटले दाखल झाले. अनेक गैरव्यवहार बंद झाले. कुणाचीही पर्वा न करता किंवा कुणाच्याही दबावाखाली न येता त्यांची कामगिरी जोमात सुरू राहिली. त्यापूर्वी सतत बदल्यांना सामोरा जाणारी प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीचा मागोवा घेतला तर नोकरीत रुजू होण्यापूर्वीच त्यांची तीनदा बदली झाली हे देशाच्या सनदी सेवेतील एकमेव उदाहरण असावे. ती त्यांच्या भविष्याची जणू नांदीच होती.
तुकाराम मुंढे यांच्या नावावर 20 वर्षांत 25 बदल्यांचा दुर्मिळ पाराक्रम नोंदवला गेला तो त्यांनी कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य दिले म्हणून. त्यांच्या स्वभावाचाच तो भाग होता. सनदी अधिकारी झाल्यावर प्रशिक्षण काळात भर सभागृहात मंत्री आणि आमदारांना त्यांनी अडचणीत आणणारे विचारलेले प्रश्न, डान्सबारवर टाकलेली धाड, लाच खाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची घेतलेली झाडाझडती यातूनच त्यांची पुढची वाटचाल कशी असेल याची झलक सर्वांनाच पाहायला मिळाली होती. अशा या वादळी व्यक्तिमहत्त्वाची जडणघडण कशी झाली याविषयी जनतेमध्ये औत्सुक्य असले तर नवल नाही. त्याचीच पूर्ती शफी पठाण या त्यांच्या निकटच्या सकाऱ्याने त्यांच्यावरील ‘तुकाराम’ हे चरित्रवजा पुस्तक लिहून केली आहे. ते वाचले की, तुकाराम मुंढे या कर्तव्यनिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याच्या वारंवार बदल्या का होतात, त्यामागे सरकारमधील काही मंत्र्यांचे, काही आमदारांचे, काही सरकारी आश्रयदात्यांचे हात कसे असतात याचाही उलगडा होईल. या चरित्रात्मक पुस्तकाचा खरे तर हा पहिला भाग असावा तोही त्यांच्या बालपणापासून प्रारंभीच्या प्रशासकीय कारकीर्दीचा. तिथून त्यांच्या जीवन संघर्षाला सुरुवात झाली आणि आज या जीवन संघर्षाचे पुढचे टप्पे आपण अनुभवत आहोत. त्यांच्या चरित्राचे आणखी कितीतरी खंड निघू शकतील, इतकी नाट्यमयता आणि घटनांचे वैविध्य त्यात आहे.
आतापर्यंत तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त दूध, तेल, मसाले, मिठाई, बनावट व कालबाह्य औषधे, नकली सौंदर्य प्रसाधने, फुटपाथवरील खाद्यपदार्थ पी, औषधांवरील चुकीचे लेबल, एक्सपायरी डेट बदलण्याचे गुन्हे, मुलांसाठी घातक असलेले जंकफूड याविरुद्ध धडक कारवाई केली, मुंबईतील नामांकित खासगी आणि सरकारी उपाहारगृहातील अस्वच्छताही उजेडात आणली. काहींना ही स्टंटबाजी वाटली, पण असे आरोप करणाऱ्यांनी त्यांच्यावरील ‘तुकाराम’ हे चरित्रात्मक पुस्तक वाचले तर त्यांच्या कर्तव्यकठोर स्वभावाचाच अविभाज्य भाग असल्याचे लक्षात येईल.
मराठवाडय़ातील बीड तालुक्यात ताडसोन्ना या गावात तुकाराम मुंढे यांचा 1975 या वर्षी नवरात्रात जन्म झाला. अगदी रांगत असतानाच्या वयात हा लहानगा तुकाराम अंगणातल्या प्रशस्त माडीच्या काठावरून दगडी चौकावर 12 फूट उंचीवरून पडला आणि बेशुद्ध झाला. दैवयोगाने तो वाचला. जणू नियतीलाच त्याच्या हातून भविष्यात काही कल्पनेपलीकडचे दिव्य आणि सकारात्मक घडवायचे होते. घरात अठराविश्वे दारिद्रय़. त्यामुळे ध्येयप्राप्तीच्या मार्गात येणारी संकटे, वेगवेगळय़ा कारणांनी समाजाकडून होणारी उपेक्षा आणि त्यामुळे मनात चाललेले वैचारिक द्वंद्व यावर तुकाराम मुंढे यांनी प्रदीर्घ परिश्रमाने कशी मात केली याचे वास्तववादी चित्रण या पुस्तकात पाहायला मिळेल.
महाराष्ट्रातील मराठी जनतेमध्ये आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करणाऱ्या या चरित्र नायकाच्या केवळ यशाचे गोडवे या पुस्तकात गायलेले नाहीत, तर त्या यशासाठी कराव्या लागलेल्या पराकोटीच्या कष्टाचे, त्यागाचे, एकाकी धडपडीचे आणि विवंचनेचे तटस्थ विवेचन या पुस्तकात लेखकाने केले आहे. आजच्या प्रचंड आत्मकेंद्री आणि मोहात पडून विकल्या जाणाऱ्या सामाजिक काळात सनदी अधिकारी असलेली एक व्यक्ती स्वार्थाच्या संधी झुगारून व्यापक समाजहिताच्या दृष्टीने समकालीन इतिहासाच्या पानावर आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटवते हे वाचून नव्या पिढीला आत्मपरीक्षणाची दृष्टी लाभावी हा या लिखाणामागचा लेखकाचा हेतू नक्कीच साध्य झाला आहे, असे म्हणता येईल.
त्यांचे मोठे भाऊ अशोक रीभाऊ मुंढे जे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून निवृत्त झाले, तेच तुकाराम मुंढे यांचे आदर्श होते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर तो केवळ पदवी मिळवण्यासाठी शिकला नाही, तर त्याने शिक्षणाकडे स्वत:चे आणि समाजाचे नशीब बदलण्याचे शस्त्र म्हणून पाहिले. म्हणूनच तो आयएएस अधिकारी होऊ शकला.
एक सच्चा सनदी अधिकारी फाईल्समधल्या पानांच्या पल्ल्याड जाऊन माणसांची वेदना वाचतो आणि ती नाहिशी करण्याच्या प्रयत्नात आपले नुकसान करून घेतो असे उदाहरहण दुर्मिळ असल्याचे त्याचे वडीलबंधू म्हणतात ते खरंच आहे. तुकाराम मुंढे यांचा जीवनप्रवास इतका चित्रविचित्र आहे की, तो वाचताना कोणीही थक्क होईल. आधी सायन्सला नंतर आर्टस्ला प्रवेश, कॉलेजात प्राध्यापकी, मिळालेल्या मोठय़ा नोकऱ्या लाथाडून आपल्या ध्येयाकडे जाण्याचा प्रयत्न, आयएएस परीक्षार्थींना मार्गदर्शन, मुलाखतीत प्रश्नकर्त्यांवर टाकलेला प्रभाव, कुशाग्र बुद्धीचा योग्य उपयोग, योग्यवेळी अचूक निर्णय आत्मविश्वासाने घेण्याची क्षमता या त्यांच्या गुणांना लेखकाने प्रकर्षाने अधोरेखित केले आहे. काही ठिकाणी लेखकाने तुकाराम यांच्या अनपेक्षित निर्णयांची केलेली तर्ककठोर चिकित्सा नि:पक्षपातीपणाचा प्रत्यय देणारी आहे. शफी पठाण यांनी हे चरित्रात्मक पुस्तक लिहिताना तुकाराम मुंढे यांच्या संघर्षमय वाटचालीचा, प्रशासकीय पारदर्शकतेचा, तडजोड न करणाऱ्या स्वभावाचा तसेच समाजहितासाठी केलेल्या कार्याचा प्रेरणादायी प्रवास उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
पुस्तकाची भाषा सहज-सोपी, अकृत्रिम असून प्रत्येक प्रसंग पारदर्शी आहे. काही ठिकाणी लेखकाने तुकाराम यांच्या काही अनपेक्षित निर्णयांची केलेली कठोर चिकित्सा नि:पक्षपातीपणाचा प्रत्यय देणारी आहे. 17 जुलै 2026 ला ‘तुकाराम’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली आणि दुसऱ्याच दिवशी 26 वी आवृत्ती प्रकाशित झाली यावरून त्यांची अफाट लोकप्रियता लक्षात येते. त्यांच्या कर्तृत्वाने ती उत्तरोत्तर वाढत जाईल, याची खात्री वाटते. ख्वाजा सय्यद यांचे मुखपृष्ठ व रत्नेश चोरगे यांची अंतर्गत मांडणी सुबक आहे. पुस्तकातील मुंढे कुटुंबाची रंगीत छायाचित्रेही वेधक आहेत.
तुकाराम : (चरित्र)
लेखक : शफी पठाण
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठे : 216, मूल्य – रु. 250/-



























































