
>> जी. के. पवार
मृत्यू तर प्रत्येकाला अटळच आहे. पण पूर्वजांच्या पराक्रमांच्या स्मृतींसाठी, आपल्या देशासाठी प्राणांची आहुती देणं हे सर्वश्रेष्ठ मरण आहे. देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या शूरवीरांच्या कथांमधून ‘बलिदान’ हे पुस्तक कर्तव्य, त्याग आणि सर्वस्व समर्पण यांचे मूर्त स्वरूप आपल्या समोर ठेवते. वीरतेच्या युद्धामध्ये बलिदान हा सर्वोच्च धर्म आहे असा संदेश देणाऱ्या ‘बलिदान’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या लेखिका स्वप्निल पांडे असून त्याचा मराठी अनुवाद उल्का राऊत यांनी केला आहे.
पॅरा स्पेशल फॉर्सेस (Para SF) हे भारतीय सैन्याच्या पॅराशुट रेजिमेंटमधील विशेष दलाचे गट आहेत. यांचे मुख्य उद्दिष्ट राष्ट्राची सुरक्षा राखणे आणि धोकादायक परिस्थितीमध्ये कारवाई करणे हे आहे. या दलांना भारतीय लष्करातील सर्वांत प्रतिष्ठित आणि धाडसी घटक मानले जाते. अशा दलातील काही शूरवीरांच्या कथा या पुस्तकात अंतर्भूत आहेत, ज्या वाचकाला थक्क करून सोडतात.
‘बलिदान’ हे पुस्तक सुरुवातीपासूनच वीररसाने ओथंबलेले आहे. पुस्तक लिहिण्यासाठी लेखिकेने विशेष दलातील जवान, त्यांचे कुटुंबीय, मित्र, सहकारी आणि इतर संबंधित लोकांच्या शेकडो मुलाखती घेतल्या आहेत. तसेच विविध विशेषत: आणि LOC (Line fo Control) आणि LAC (Line Actual Control) जवळच्या तळांना भेटी दिल्या आहेत. कर्नल संतोष महाडिक, ब्रिगेडियर सौरभ सिंग शेखावत, कॅप्टन महेंद्रसिंग, कॅप्टन तुषार महाजन, मेजर मनीष सिंग, पॅराट्रुपर छत्रपाल सिंग इ. वीरांच्या जीवनकथा वाचकांच्या मनात धैर्य, गौरव आणि अभिमानाची ज्वाला प्रज्वलित करतात.
या कथांमधून धोकादायक आणि निर्णायक मोहिमांची थरारक माहिती मिळते. गोळीबार चालू असतानाचा भारतीय कॅप्टन व आतंकवाद्याचा परस्परांना आव्हान करणारा संवाद तसेच गुप्त वेशांतर करून दहशतवाद्यांच्या खबरीची फसगत करून त्याच्यास म्होरक्यालाही अटक करणारा कॅप्टन ही उदाहरणे, वास्तव हे अद्भुत असते याची प्रचीती देणारी आहेत. स्पेशल फोर्सेसमधील जवानांच्या परिवाराचे महत्त्वदेखील यात अधोरेखित केले आहे.
पुस्तकातील भाषा साधी, पण अत्यंत प्रभावी आहे. या कथा स्वतंत्र असल्या तरी एकसंध वाटतात. युद्धवर्णने मर्यादित, गुप्ततेच्या मर्यादा पाळून, पण नेमकी आहेत. या सर्वांमुळे पुस्तक सत्य आणि साहित्य या दोन्ही पातळ्यांवर यशस्वी ठरते. हा ग्रंथ वाचकाला अभिमानाची साक्ष, करुणेची अनुभूती आणि देशसेवेच्या मूल्यांची जाणीव असा एक संपूर्ण, सखोल आणि प्रेरणादायी अनुभव मिळतो. हा मराठी अनुवाद उल्का राऊत यांनी अत्यंत समर्थपणे केला आहे. अनुवाद करताना मूळ ग्रंथातील ज्वलंत भावना, सैनिकांच्या संवादांची उग्रता आणि प्रसंगांची नाट्यमयता अबाधित ठेवण्याची जबाबदारी त्यांनी अत्यंत कुशलतेने पार पाडली आहे. त्यांच्या भाषेतील सहजता, प्रवाहीपणा आणि भावार्थाची अचूकता आपणास मूळ पुस्तक वाचत असल्याची प्रचीती देणारी आहे. ज्या लोकांना भारतीय लष्कर, विशेषत Special Forces मध्ये स्वारस्य वाटते, त्यांना ऑपरेशन्स, ट्रेनिंग आणि मिशन्सच्या दृष्टिकोनातून चांगली माहिती मिळते. या पुस्तकातून कळते की, भारतीय विशेष दलाचे शौर्य हे केवळ रणांगणातील लढाईत नसून त्यांच्या शिस्तीमध्ये, प्रशिक्षणात, मानसिक कणखरपणात आणि राष्ट्रनिष्ठेत खोलवर रुजलेले आहे.
बलिदान
लेखक : स्वप्निल पांडे
अनुवादक : उल्का राऊत
प्रकाशन : साकेत प्रकाशन
पृष्ठे : 232 किंमत : 299 रु.



























































