। मना जे घडी राघवे वीण गेली । 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संध्या शहापुरे

मना जे घडी राघवे वीण गेली । जनी आपली ते तुवा हानी केली।

रघुनायकावीण तो शीण आहे। जनी दक्ष तो लक्ष लावूनी पाहे।।

या श्लोकाचा अर्थ अगदी सरळ आहे. पण बोध महत्त्वाचा आहे. श्रीरामाच्या जीवनाला समजून घेणं, रामायणातून बोध घेणं आवश्यक आहे. भगवान श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. प्रभू रामचंद्रांनी, सुखाशी  तडजोड करून न्याय आणि सत्याचा मार्ग अवलंबला .या गुणांमुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे संबोधले जाते. श्रीरामांच्या अनेक गुणांपैकी काही गुण अंगीकारले, तर आपले जीवन नक्कीच यशस्वी होऊ शकते. श्रीरामाने सत्य, दया, करुणा, धर्म आणि प्रतिष्ठेच्या मार्गावर राज्य केले. श्रीरामाच्या चरित्रात स्त्रीला बंधमुक्त करण्याचा इतिहास सांगितला आहे. स्त्रीचे अपहरण करणाऱ्याला कठोर म्हणजे देहांताचे शासन करणे हे रामायणाचे सार सर्वस्व आहे. पत्नीच्या अब्रूसाठी आणि आपल्या कुळाच्या यशासाठी रामचंद्राने घनघोर युद्ध केले म्हणून रामाच्या नावाचे रामायण झाले. ‘रामदास म्हणे माझा, रामस्वामी दयानिधी, तोडीले बंध देवांचे, तो हा त्रैलोक्य नायक’ अशा बंधन विमोचक रामचंद्राच्या उपासनेची आवश्यकता समर्थ रामदासांना वाटली. म्हणूनच समर्थांनी श्री राम नवमीचा उत्सव आपल्या समर्थ संप्रदायासाठी करण्याचे ठरविले. कोणत्याही देवतेचे आराधन करण्यातून, उपासकांच्या मनाला एक प्रकारचे स्वधर्माचे, स्वराष्ट्राचे, सुसंस्कृत करण्याचे वळण लागते. ‘जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे… या उक्तीमागे हाच अर्थ सामावलेला आहे.