
>> सोहम पिंगळीकर
[email protected]
एखादा सिनेमा स्वतंत्र आख्यायिका ठरतो. मात्र कधी कधी या आख्यायिकांना भांडवल बनवून ‘सिक्वेल’ म्हणून सादर केलं जातं. हाच ‘कल्टचा बाजार’!
2007 मध्ये विशेष फिल्म्सच्या बॅनरखाली ‘आवारापन’ नावाचा सिनेमा आला आणि काहीही कमाई न करता गेलासुद्धा, पण या फिल्ममधली मुस्तफा झाहिदने गायलेली गाणी मात्र प्रचंड लोकप्रिय झाली. या गाण्यांमुळे एक विशिष्ट प्रेक्षक या फिल्मकडे ओढला गेला. सिनेमामध्ये इम्रान हाश्मीने साकारलेला शिवम पंडित, त्याची ट्रजिक लव्हस्टोरी, त्याची मैत्री, त्याची बगावत असा सगळा मसाला होता. शिवमने गमावलेलं प्रेम, त्याला झालेला पश्चात्ताप आणि त्यासाठी केलेलं प्रायश्चित्त या रचनेमुळे कितीतरी आशिकांना एक दर्दी आयकॉन मिळाला. ‘तेरा मेरा रिश्ता’, ‘माहिया’, ‘तो फिर आओ’ ही गाणी, इम्रानची अँटी-हिरो प्रतिमा आणि त्याचा नास्तिक-आस्तिक हा प्रवास या सगळ्यांमधून या फिल्मचा निष्ठावान प्रेक्षकवर्ग तयार झाला. जुन्या सिनेमाचा हा निष्ठावान प्रेक्षकवर्गच नव्या सिनेमाचं भांडवल ठरला आहे.
आता ही सगळी प्रक्रिया होण्यासाठी बराच काळ लागतो, पण एकदा असा कल्ट दर्जा मिळाल्यानंतर सिनेमाचं बाजारीकरण व्हायला वेळ लागत नाही. विशेष फिल्म्सखाली आलेल्या इम्रान हाश्मीच्या ‘जन्नत’, ‘मर्डर’, ‘राझ’ या फिल्म्सना उच्चभ्रू वर्गाने बाजूला टाकलं असलं, तरी तरुण वर्गात त्यांची प्रचंड क्रेझ आहे. विशेषत इम्रानची सगळीच गाणी प्रचंड हिट आहेत. या सगळ्या भांडवलावर पहिल्या सिनेमात सहा गोळ्या लागूनही शिवम वाचतो, असं स्पष्टीकरण देत ‘आवारापन 2’ काढण्यात आला. म्हणूनच गेल्या आठवडय़ात हा सिनेमा रिलीज झाला आणि त्याने अवघ्या काही तासांत पहिल्या सिनेमापेक्षा जास्त कमाई केली आहे.
काही सिनेमे पुढच्या भागांची शक्यता घेऊनच जन्माला येतात त्यांना फ्रँचायझी म्हणता येते, पण कल्ट स्टेटस हा सिनेमाचा जन्मजात गुणधर्म नसून कालांतराने घडणारी प्रक्रिया आहे. पुढच्या भागांना पात्रं, कथाविश्व वारसा हक्काने मिळतं खरं, पण म्हणून पुढचा भागही पहिल्यासारखा कल्ट होईलच असं नाही. आता एका कल्ट सिनेमाचा पुढचा भाग म्हणून ‘आवारापन 2’ चं मार्केटिंग केलं जात आहे, पण नेमकं त्यात काय विकलं जात आहे?
नव्या कथेसोबत इम्रान हाश्मीची जुनी प्रतिमा, जुन्या गाण्यांचे नवे व्हर्जन, त्या काळचा सिनेमा पुन्हा पाहायला मिळण्याची भावना आणि त्या सिनेमाशी जोडलेल्या वैयक्तिक आठवणीसुद्धा विकल्या जातात. जुनी पिढी नॉस्टॅल्जियासाठी आणि नवी पिढी उत्सुकतेपोटी तिकीट विकत घेते, पण इथे एक गंमत आहे-आठवण विकता येते; आठवण निर्माण करणारा मूळ अनुभव मात्र विकत देता येत नाही.
कल्ट तयार होतो तेव्हा त्याचं मूल्य केवळ बॉक्स ऑफिसवर ठरत नाही. एखाद्या सिनेमाभोवती प्रेक्षकांचा निष्ठावान समुदाय तयार होतो आणि हा समुदाय सिनेमाभोवती एक स्वतंत्र भाषा, आठवणी आणि सांस्कृतिक मूल्य तयार करतो, पण एकदा या प्रक्रियेतून निर्माण झालेलं मूल्य बाजाराच्या लक्षात आलं की कल्ट हेच मार्केटिंग तंत्र म्हणून वापरलं जाऊ लागतं. प्रेक्षकांनी जमवलेल्या सांस्कृतिक भांडवलाचं आर्थिक भांडवलात रूपांतर करण्याचा प्रयत्न होतो. ज्या सिनेमाचा शोध प्रेक्षकांनी घेतला, तोच सिनेमा आता प्रेक्षकांना शोधून विकला जातो.
पण ही इम्रान हाश्मीच्या सिनेमांमागची गणितं असली तरी कल्ट तयार होण्यामागची कारणं वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ, 2006 मध्ये आलेला ‘खोसला का घोसला’ हा सिनेमा खरीखुरी वाटणारी पात्रं, त्यांची होणारी फसवणूक, त्यांची मध्यमवर्गीय मूल्यं आणि यातून तयार होणारा सामाजिक उपरोध या कारणांमुळे नावाजला गेला. या सिनेमाचं कल्टपण कोण्या स्टार किंवा गाण्यांवर आधारित नाही. त्याची ताकद पात्रांमध्ये, संवादांमध्ये, विनोदात आणि मध्यमवर्गीय प्रेक्षकांच्या स्वतच्या आयुष्याशी असलेल्या नात्यात आहे. आता पुढच्याच आठवडय़ात या सिनेमाचा दुसरा भाग येत आहे. पहिल्या सिनेमाची मुख्य प्रवाहापेक्षा वेगळी ओळख असल्याने दुसऱया भागाचं मार्केटिंगसुद्धा कल्ट सिनेमाचा सिक्वल म्हणून केलं जात आहे.
म्हणजेच कारणं काहीही असली तरी एकदा कल्ट झाल्यानंतर त्यांचा विक्रय एकाच पद्धतीने केला जातो. पहिल्या भागातील पॅटर्न पुन्हा तयार करायचा प्रयत्न होतो. ज्या वर्गाने सिनेमाला डोक्यावर घेतलं, त्याच वर्गाला साकडं घातलं जातं. जुन्या सिनेमातील विश्व नव्याने अनुभवायची संधी दिली जाते आणि पूर्वी न चाललेल्या सिनेमाला आता भरपूर कमाई करवून द्यायची जबाबदारी या निष्ठावान प्रेक्षकांवर टाकली जाते. इथेच महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. कल्ट म्हणून एखाद्या सिनेमाचं मार्केटिंग केलं आणि त्याच्या कल्टपणाची चिन्हं नव्या सिनेमात पुन्हा वापरली, तर खरंच तो सिनेमा कल्ट होतो का?
जुना हिरो आणला, जुन्या गाण्यांचे रिमेक केले, दोन जुन्या पात्रांची एन्ट्री, चार नॉस्टॅल्जिक संदर्भ आणि वर ‘कल्ट’चा शिक्का मारला की प्रेक्षक पुन्हा येतील, असं बॉक्स ऑफिसचं गणित असतं. पण पहिल्या सिनेमाला कल्ट बनवणाऱ्या गोष्टींची यादी करून दुसऱया सिनेमात त्या सगळ्या घातल्या तरी हा सिक्वल कल्ट होईल याची खात्री नसते. कारण कल्ट तयार करण्याचा काही फॉर्म्युला नसतो.
खरे तर आता ‘कल्ट फिल्म’ हेच एक मार्केटिंग लेबल बनत चाललं आहे. आधी ‘कल्ट’ हा शिक्का एखाद्या सिनेमाला त्याच्या प्रवासानंतर मिळायचा. पुनः पुन्हा बघणे, संदर्भ आठवणे, पात्रांशी स्वतच्या आठवणी जोडणे या सगळ्यातून कालांतराने त्या सिनेमाची एक स्वतंत्र आख्यायिका तयार व्हायची, पण आता ही प्रक्रिया बाजाराला माहिती झाल्यामुळे पिक्चर बनवतानाच तो जुना अनुभव पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न आणि त्यातल्या ठरावीक चिन्हांची विक्री करता येते.
पण प्रत्येक सिक्वल हा फक्त बाजाराचा डाव असतो, असंही नाही. एखाद्या निर्मात्याला खरोखरच पुढची कथा सांगायची असू शकते किंवा प्रेक्षकांनाही आपल्या आवडत्या पात्रांना पुन्हा पाहायचं असू शकतं. प्रश्न सिक्वल खरा की खोटा हा नाही. प्रश्न एवढाच आहे की, या वेळी कल्ट प्रेक्षक तयार करत आहेत की इंडस्ट्री?
कारण शेवटी कल्ट ही एक प्रक्रिया आहे. प्रत्येक सिनेमा कल्ट होण्याची कारणं वेगळी, कालावधी वेगळा, प्रेक्षकवर्ग भिन्न, त्या प्रेक्षकांची पाहण्याची दृष्टी वेगळी आणि त्याप्रति निष्ठा व्यक्त करण्याची पद्धतही निरनिराळी असते. त्यामुळे कल्टची लक्षणं कॉपी केली तरी तयार होण्याची प्रक्रिया कॉपी करता येत नाही.
(लेखक चित्रपट अभ्यासक व समीक्षक आहेत.)



























































