
>> प्रा. समीर जाधव
तंजावरमधील कलापरंपरांमध्ये नृत्यकलेला – भरतनाट्यम या नृत्यप्रकाराला विशेष महत्त्व होते. अराचलूर शिलालेखातील नृत्याचा उल्लेख, मंदिरांच्या शिल्पांमध्ये विविध नृत्यमुद्रा यातून हे उमगते.
तंजावरमध्ये संगीताप्रमाणेच नृत्यालादेखील एक प्राचीन परंपरा लाभली आहे. नृत्यावरील सर्वात जुन्या शिलालेखांपैकी एक अराचलूर येथे आहे. त्यात काही अक्षरांचा संच आहे, जो आजच्या भरतनाट्यम्च्या भाषेत ‘सोल्लू कट्टू’ म्हणून ओळखला जाणारा ताल निर्माण करतो.
भारतातील सर्वात प्राचीन नृत्य प्रकारांपैकी एक असलेल्या भरतनाट्यम्ला तंजावरचे अपत्य म्हणता येईल, कारण अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात येथेच त्याला आज आपण ओळखत असलेल्या स्वरूपात पद्धतशीर रूप देण्यात आले. मूलतः ‘सदिर’, ‘सदिर नाट्यम’ किंवा ‘दासी अट्टम’ अशी नावं असलेला हा नृत्यप्रकार देवदासींच्या अधिपत्याखाली होता. देवदासी उत्सवप्रसंगी मंदिरात, रथयात्रेत याचे सादरीकरण करीत. पुढे याचे नाव बदलून भरतनाट्यम् असे ठेवण्यात आले. याचाच अर्थ भरतनाट्यम थेट नाट्यशास्त्रातून निर्माण झालेले नसून तर ते दक्षिण भारतातील स्थानिक नृत्य, मंदिरविधी, संगीत आणि अभिनय यांच्या परस्परसंवादातून विकसित झालेले आहे. चोळ काळापर्यंत स्त्री आणि पुरुष दोघेही नर्तक होते आणि हे पद वंशपरंपरागत झाले.
भगवान शिवाच्या मंदिरांमध्ये नृत्य करणाऱ्या नर्तकांना ‘देवराडियार’ म्हटले जात असे. मंदिरात नृत्य सादर करण्याच्या बदल्यात नर्तकींना जमीन दिल्याचा उल्लेख असलेले अनेक चोळ शिलालेख आहेत. यापैकी सर्वात महत्त्वाचा शिलालेख तंजावर येथील बृहदीश्वर मंदिरात आहे. जिथे राजराजा चोल पहिला याने राजाराजेश्वर नाटकम, पंपुलियूर नाटकम आणि तिरुमूलर नयनार कूथू यांसारखी नृत्यनाट्ये सादर करण्यासाठी चारशे नर्तकींची नेमणूक केली होती. चोल राजवटीच्या काळात तामीळनाडूतील मंदिरांच्या शिल्पांमध्ये विविध नृत्यमुद्रा कोरलेल्या आढळतात.
तंजावर परिसरातील मंदिरांनी संगीत आणि नृत्याच्या विकासाला विशेष चालना दिली. पुढे नायक आणि मराठा राजवटीच्या काळातही तंजावर हे नृत्य-संगीताचे महत्त्वाचे केंद्र राहिले. 18 व्या-19 व्या शतकात तंजावर क्वार्टेट म्हणून प्रसिद्ध असलेले चिन्नय्या, पोन्नय्या, शिवानंदम् आणि वडिवेलू हे चार भाऊ सर्फोजीराजे द्वितीय आणि शिवाजीराजे द्वितीय यांच्या कारकिर्दीत होऊन गेले. या चौघांनी भरतनाट्यमच्या सादरीकरणाची रचना अधिक शिस्तबद्ध केली. स्वराजाती, अलारिप्पू, जातीस्वरम, वर्णम, थिल्लाना आणि दरू यांसारख्या नृत्यासाठी असलेल्या गीतांची रचना करण्याव्यतिरिक्त, त्यांनी भरतनाट्यम सादरीकरणाच्या पद्धतीला संहिताबद्ध केले म्हणूनच आजच्या भरतनाट्यमच्या कार्यक्रमातील मार्गम् विकसित करण्याचे मोठे श्रेय त्यांना दिले जाते.
मराठा राजवटीच्या समाप्तीनंतर, इतर कलाकारांप्रमाणेच नर्तकीही एका पेचात सापडल्या. राजश्रय गमावल्यामुळे त्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला. काही देवदासींनी इतर लहान दरबारांमध्ये स्थलांतर करणे पसंत केले. तर काहींनी मद्रासला जाणे पसंत केले. यात प्रसिद्ध नृत्यांगना तंजावर बालासरस्वती यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे. ज्यांच्या चुलत बहिणी वृंदा आणि मुक्ता पुढे गायिका म्हणून तितक्याच प्रसिद्ध झाल्या. इतर अनेकींनी आपल्या गावातच राहणे पसंत केले आणि मंदिरातील विधींसाठी व अधूनमधून होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी नृत्य करून साधी उपजीविका केली. 19 व्या शतकात ब्रिटिश राजवटीचे बळकटीकरण आणि व्हिक्टोरियन काळातील शिष्टाचाराच्या जाणिवेमुळे त्यांच्या परिस्थितीला मदत झाली नाही. त्यांना अनैतिक ठरवण्यात आले आणि ‘देवदासी’ हा शब्द व्यभिचाराशी जोडला गेला. 19 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत देवदासींची मंदिरात एक महत्त्वाची भूमिका होती, परंतु हळूहळू त्या समाजाच्या नैतिकतेच्या परिघावर जगणारी व्यक्ती बनल्या.
19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीलाही, तंजावरच्या नर्तकींना राजवाड्यात नेहमीसारखा आश्रय मिळत नसला तरी, त्या इतर भाषांमध्ये पारंगत होत्या आणि तंजावरमध्ये तसेच म्हैसूरसारख्या दरबारांमध्ये त्यांना उच्च मान दिला जात होता. काहींनी संस्थांमध्ये नृत्य शिकवण्यास सुरुवात केली, तर टी. आर. राजकुमारी यांच्यासारख्या इतर जणी चित्रपटसृष्टीकडे वळल्या; जे 20 व्या शतकातील एक नवीन सर्जनशील माध्यम होते आणि सनातनी कुटुंबातील स्त्रियांसाठी ते वर्ज्य होते. आज भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरेत भरतनाट्यम या नृत्यप्रकाराला केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात एक प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी आहे. या प्रतिष्ठा, प्रसिद्धीच्या मागे समृद्ध परंपरेचा आणि संघर्षाचा इतिहास आहे. या सर्वांची मुळे कावेरी खोऱ्यातील तंजावरच्या भूमीतून उगम पावलेली आहेत असे म्हणता येईल.
(लेखक तंजावरची कला, संस्कृती, साहित्य याचे अभ्यासक आहेत.)



























































