
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील कशेडी बोगद्यातील पाण्याचा पाझर आणि गळती अद्यापही थांबलेली नाही. ऐन गणेशोत्सवाच्या काळात कोकणात ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना व वाहनचालकांना या गळतीमुळे मोठ्या कसरतीचा सामना करावा लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून गळती रोखण्यासाठी करण्यात आलेले सर्व उपाय निष्फळ ठरले असून, दोन्ही बोगद्यांमधील सद्यस्थितीत गळती सुरूच आहे.
गणेशोत्सवासाठी दरवर्षी लाखो चाकरमानी मुंबई, ठाणे आणि पालघर भागातून कोकणात दाखल होतात. या काळात महामार्गावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित व्हावी यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. कशेडी बोगद्याचे काम पूर्णत्वास गेलेले असले तरी बोगद्यातील गळती अव्याहतपणे सुरूच आहे. मात्र, पावसाळ्यात बोगद्याच्या छतावरून आणि भिंतींवरून पाण्याचे मोठे फवारे उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे बोगद्याच्या आतील रस्ता निसरडा झाला असून अपघाताचा धोका वाढला आहे.
पाण्याचा निचरा योग्य रीतीने न झाल्याने व गळती रोखण्यासाठी केलेले कोटिंगचे काम टिकू न शकल्याने प्रशासनाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. बोगद्यात गळणाऱ्या पाण्यामुळे दुचाकी आणि चारचाकी चालकांना गाड्या चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन केवळ मलमपट्टी न करता, बोगद्यातील गळतीवर तातडीने कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
एका दृष्टीक्षेपात माहिती
- एकूण खर्च – सुमारे ५०२ कोटी
- बोगद्याची लांबी – २ किलोमीटर (प्रत्येकी २ लेनचे २ समांतर बोगदे)
- रुंदी व उंची – रुंदी – १४ मीटर, उंची – ८ मीटर (३-३ मार्गिका/लेनसाठी जागा)
- जोडरस्ते – बोगद्याच्या दोन्ही बाजूंना एकूण ७ किलोमीटर लांबीचे अॅप्रोच रोड्स (जोडरस्ते) जोडण्यात आले आहेत, ज्यामुळे संपूर्ण प्रकल्पाची लांबी ९ किलोमीटर होते.
बोगद्यातील इतर यंत्रणा
१) प्रकाश व वीज व्यवस्था : हाय-टेक एलईडी पथदीप आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी ११ केव्ही वीज पुरवठ्यासह जनरेटर बॅकअप
२) सुरक्षा यंत्रणा : आधुनिक हवा खेळती राहण्यासाठी व्हेन्टीलेशन सिस्टीम सीसीटीव्ही कॅमेरे आणि अग्निरोधक यंत्रणा
३) क्रॉस पॅसेज : दोन्ही बोगद्यांना अंतर्गत जोडणारे आपत्कालीन रस्ते
गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय बांधकाम विभागाकडून करण्यात आलेले उपाय
मुंबई -गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील पाणीगळती रोखण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग विभाग व कंत्राटदार कंपनीकडून विविध टप्प्यांत तांत्रिक व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
१) आय. आय. टी. तंत्रज्ञांचे मार्गदर्शन व सर्वेक्षण – गळतीची नेमकी कारणे शोधण्यासाठी आणि योग्य तांत्रिक तोडगा काढण्यासाठी आयआयटी च्या तज्ज्ञांची मदत घेऊन संपूर्ण बोगद्याचे सर्वेक्षण करण्यात आले.
२) केमिकल ग्राऊंटिंग – खडकांमधील भेगांमधून येणारे पाणी रोखण्यासाठी उच्च दाबाने केमिकल आणि सिमेंटचे मिश्रण टोचून गळतीचे स्त्रोत बंद करण्याचे काम करण्यात आले.
३) ड्रेनेज आणि पन्हाळी – बोगद्याच्या छतातून गळणारे पाणी थेट रस्त्यावर किंवा वाहनांवर पडू नये म्हणून विशिष्ट पन्हाळी लावून ते पाणी मुख्य ड्रेनेज लाईनद्वारे बोगद्याबाहेर सुरक्षितपणे काढण्यात आले.
४) वॉटरप्रूफिंग आणि पीव्हीसी मेम्ब्रेन – अंतर्गत भागातील खडकाचा दाब आणि पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी शॉटक्रिट सह पीव्हीसी मेम्ब्रेन आणि फायबर शीटचे अस्तर बसवण्यात आले.
प्रकल्पाचा आणि दुरुस्तीचा खर्च
१) मूळ प्रकल्प खर्च – कशेडी घाटातील दुहेरी (६ लेन) बोगदा आणि जोडरस्त्यांच्या एकूण बांधकामासाठी सुमारे ५०२/- कोटी इतका मंजूर खर्च निश्चित करण्यात आला होता.
२) गळती दुरुस्तीचा खर्च – गळती रोखण्याचे हे काम प्रकल्पाच्या ‘दोष दायित्व कालावधी अंतर्गत येतो. त्यामुळे कंत्राटदार कंपनीवरच या मोफत दुरुस्तीची आणि देखभालीची जबाबदारी असते. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या दुरुस्तीसाठी स्वतंत्र किंवा वेगळा अतिरिक्त खर्च घोषित केलेला नाही, कारण हा खर्च मूळ कंत्राट आणि मेंटेनन्स कराराचाच भाग मानला जातो.




























































