
तिबेटमधील पुरामुळे नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे सद्गुरुंच्या ईशा फाउंडेशनचे 77 यात्रेकरू बेपत्ता झाले आहेत. तिबेटमधील कैलास मानसरोवरची यात्रा करून परतत असताना यात्रेकरूंचा हा गट इमिग्रेशन कार्यालयात थांबला होता. प्रलयसदृश परिस्थिती दर्शवणारा एक व्हिडिओ शेअर करत, सद्गुरुंनी तिबेटमधील ग्यिरोंग येथे त्यांच्या टीमवर ओढवलेल्या या संकटाची माहिती दिली.
तिबेट-चीनमधील ग्यिरोंग येथे भयंकर पूर आला असून, आमची कैलास यात्रेकरूंची एक तुकडी त्यात अडकली आहे. परतत असताना ते इमिग्रेशन कार्यालयात थांबले होते तेव्हा हा पूर आला. या पुरात इमिग्रेशन इमारत आणि शहराचा बराचसा भाग पाण्याखाली गेल्याचे दिसते, असे सद्गुरुंनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
इमिग्रेशन कार्यालयात असलेल्या लोकांच्या सद्यस्थितीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, असे सांगत सद्गुरुंनी खंत व्यक्त केली. तसेच, त्यांचे स्वयंसेवक आणि मदतकार्य करणारी पथके अत्यंत व्यथित असून बचाव कार्यात शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
तिबेटच्या सीमेला लागून असलेल्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे गावेच्या गावे पाण्याखाली गेली असून पूल आणि घरे वाहून गेली आहेत. यात आतापर्यंत 95 जणांचा मृत्यू झाला आहे.





























































