जखमी स्नेहलची मृत्यूशी झुंज अखेर संपली, पालघरमध्ये प्रियकराने केले कोयत्याने वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रियकराने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्नेहल सावंत या तरुणीची अडीच महिने सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर आज संपली. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक या पदावर काम करणाऱ्या स्नेहलवर तिचा प्रियकर अमोल मुळे याने १२ जून रोजी कोयत्याने वार केले होते. यात गंभीर जखमी झालेल्या स्नेहलचा आज उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

स्नेहल ही पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक तर तिचा प्रियकर आणि हल्लेखोर अमोल मुळे हा मुंबई उच्च न्यायालयात काम करत होता. स्नेहल ही पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरात मुद्रा अपार्टमेंटमध्ये राहात होती. १२ जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ती आपल्या घरी जात असताना अमोलने तिच्या मानेवर व कमरेवर सपासप कोयत्याने सात आठ वार केले. या हल्ल्यात स्नेहल गंभीर जखमी झाली. स्थानिक रहिवाशांनी तिला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखले केले. स्नेहलवर हल्ला केल्यानंतर अमोल तेथून फरार झाला. दोन तीन दिवसांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि पालघर पोलिसांनी वरखुंटी परिसरातून अमोल याला ताब्यात घेतले होते. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.