
ओला, उबेर आणि रॅपिडोच्या माध्यमातून राज्यात ‘बाईक टॅक्सी’ सुरू करण्याचा निर्णयामुळे हजारो मराठी रिक्षाचालकांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबत संजय राऊत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहले होते. तसेच परिवहन मंत्री रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाला भेटण्याची वेळ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र अद्याप परिवहन मंत्र्यांनी रिक्षाचालकांना भेटीची वेळ दिली नाही. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी परिवहन मंत्र्यांवर निशाणा साधला. ”परिवहन मंत्र्यांना रॅपिडोसोबत मिटींग करायला वेळ आहे पण मराठी रिक्षाचालकांसाठी नाही’, असे ते म्हणाले.
”परिवहन मंत्री या महाराष्ट्रातले धर्मात्मा आहेत. नाशिक व इतर भागातल्या रिक्षा चालकांनी संघटनांनी जी माझ्याकडे जी कागदपत्रं सुपूर्द केली त्यात स्पष्ट दिसतंय की मंत्रीमंडळातल्या मंत्र्यांना रॅपिडोने उपकृत केलं आहे. त्यांची सार्वजनिक मंडळं दहीहंड्यांना प्रायोजक म्हणून पैसे दिले आहेत. याला कॉनफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणतात. रिक्षा चालकांनी दाखवलं की परिवहन मंत्र्यांच्या कोट्यवधी दहिहंडीला स्पॉन्सरशिप दिली. हा मुद्दा समोर येत असेल तर परिवहन मंत्र्यांचं काम आहे की रिक्षाचालकांच्या आरोपांचं समाधान करायचं. तुम्ही आवाहनं कुणाला देताय? रिक्षाचालकांचं शिष्टमंडळ तुम्हाला भेटायला वेळ मागतंय? आमचं म्हणनं ऐका. रॅपिडोसोबत मिटींग करायला वेळ आहे. पण परिवहन चालकांना मराठी रिक्षाचालकांना भेटायला वेळ नाही. मराठी रिक्षाचालकांचा मुद्दा मी मांडतोय. मी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडे रिक्षाचालकांच्या वतीने वेळ मागतोय. पण तुम्ही अमित शहांना विचारल्याशिवाय वेळ देणार नाही. कारण त्यांचे पक्षप्रमुख अमित शहा आहेत. जोपर्यंत अमित शहा सत्तेतून जात नाही तोपर्यंत परिवहनमंत्री मला वेळ देऊ शकत नाही”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्र्याचं प्रगतीपुस्तक तपासत असल्याचा बातम्या सध्या येत आहेत. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना जोरदार टोला लगावला. ”उपमुख्यध्यापकच जर नापास असतील तर ते त्यांच्या विद्यार्थ्यांचं प्रगती पुस्क काय तपासणार? इथे तर मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रीमंडळ नापास आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी आधी स्वत:चं प्रगतीपुस्तक तपासायला हवं. मग मंत्र्यांचं. पण यांचे मंत्री एटीकेटीने देखील पास होऊ शकत नाही”, असे ते म्हणाले.




























































