
बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणजेच रक्षाबंधन आता प्रत्येकजण साजरा करणार आहे. सण म्हटल्यावर गोड धोड हे ओघाने आलेच. रक्षाबंधन हा दिवस प्रत्येक बहीण आणि भावासाठी अतिशय खास असतो. प्रत्येक बहिणीला आपल्या भावासाठी सर्वोत्तम राखी खरेदी करायची असते आणि त्याच्यासाठी स्वादिष्ट मिठाई आणायची असते. घरी रक्षाबंधनाच्या सणाला गोडा धोडाचे कोणते पदार्थ करायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यावर एकमेव उत्तम पर्याय आहे फिरनीचा.
मलाईदार फिरनी
साहित्य :
1 लिटर फुल क्रीम दूध
पाव कप बासमती तांदूळ
अर्धा कप साखर
वेलची पूड
गरम दुधात भिजवलेले केशर
काजू, बदाम, पिस्ता आणि गुलाब जल
- शाही फिरनी बनवण्यासाठी सर्वात आधी तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवून नंतर पाण्याचा वापर न करता मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावेत.
- त्यानंतर एका भांड्यात 1 लिटर दूध उकळण्यास ठेवावे. दुधाला एक उकळी आल्यावर गॅस मंद करून 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्यावे.
- त्यानंतर उकळत्या दुधात वाटलेला तांदूळ थोडा-थोडा घालून सतत ढवळत राहावे, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
- तांदूळ पूर्ण शिजून मिश्रण रबडीसारखे घट्ट झाल्यावर त्यात केशरयुक्त दूध आणि वेलची पूड घालून मिक्स करा.
- त्यानंतर साखर आणि थोडे सुकामेवे घालून साखर विरघळेपर्यंत आणखी 3-4 मिनिटे शिजवून शेवटी गुलाब जल घालावे.
- फिरनी थोडी थंड झाल्यावर ती मातीच्या मडक्यात किंवा बाऊलमध्ये काढून उरलेल्या सुकामेव्याने सजवावी आणि 2-3 तास फ्रिजमध्ये ठेवून नंतर थंडगार सर्व्ह करा .
- उत्तम स्वादासाठी तांदूळ नेहमी जाडसरच वाटणे आणि मातीच्या भांड्यात फिरनी ठेवणे फायदेशीर ठरते, ज्यामुळे तिला छान सुगंध येतो.



























































