
कोलंबोत विजयाचा रंग चढला होता… हिंदुस्थानच्या गोलंदाजांना श्रीलंकेच्या उरल्यासुरल्या चार विकेट्स काढायच्या होत्या आणि विजय अगदी हाताच्या अंतरावर उभा होता; पण तेवढय़ात सोनल दिनुशा नावाचा किल्लेदार भिंतीसारखा उभा ठाकला. हिंदुस्थानी गोलंदाजांच्या माऱ्याला दाद न देता त्याने तब्बल 133 धावांची नाबाद शतकी खेळी करत विजयाच्या वाटेतच काटा रोवला. एक-दोन नव्हे, अखेरच्या दिवशी तब्बल तीन सत्रे झुंज देऊनही हिंदुस्थानी गोलंदाजांना फक्त दोन विकेट टिपता आले. कसोटीच्या ताटात विजयाचा घास पडणार इतक्यात दिनुशाने तो दूर लोटला आणि कोलंबोत ‘विजयाचो खोळंबो’ केला. लंकेला फॉलोऑनची नामुष्की टाळता आली नाही. मात्र त्यांनी हिंदुस्थानला विजयाचा उंबरठा ओलांडूच दिला नाही आणि सामना अनिर्णित राखून तो जिंकल्याचा आनंद मिळवला. विजय हातात येता-येता निसटला असला तरी पहिल्या कसोटीतील विजयामुळे दोन सामन्यांची मालिका मात्र 1-0 अशी जिंकली.
सोनल दिनुशाची शानदार खेळी
दिनुशा आणि केशरा नुवान्थाने पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजीला निष्प्रभ करत श्रीलंकेचा डाव सावरला. दिनुशा आणि नुवान्थाने सातव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली. या दोघींनी 242 चेंडूंचा सामना केला आणि हीच गोष्ट श्रीलंकेला पराभवापासून परावृत्त करण्यासाठी महत्त्वाची ठरली. त्याच वेळी श्रीलंकेला लवकर बाद करण्याचे हिंदुस्थानचे प्रयत्न वारंवार अयशस्वी ठरले. कारण संपूर्ण सत्रात हिंदुस्थानवर एकही विकेट न मिळवण्याची नामुष्की ओढवली. दिनुशाने पहिल्या सत्रात आपले तिसरे कसोटी अर्धशतकही पूर्ण केले.
दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच षटकात हिंदुस्थानला विकेट मिळाली. डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथारने नुवान्थाला बाद केले. त्याने 46 धावा केल्या आणि 150 चेंडूंचा सामना केला. त्यानंतर प्रभात जयसूर्या फलंदाजीला आला आणि त्याने 28 चेंडूंमध्ये 2 धावा केल्या. त्याची विकेट रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर पडली. दिनुशा आणि जयसूर्या यांनी मिळून 71 चेंडूंमध्ये 25 धावा केल्या.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेतील पराभव
हा सामना अनिर्णित राहिल्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळण्याच्या हिंदुस्थानच्या आशांनाही मोठा धक्का बसला आहे. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला असता तर त्यांना 12 गुण मिळाले असते आणि त्यांची विजयाची टक्केवारी 63.33पर्यंत वाढली असती. ज्यामुळे ते आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचले असते. पण सामना अनिर्णित राहिल्याने हिंदुस्थान आणि श्रीलंका या दोघांनाही प्रत्येकी 4 गुणांवर समाधान मानावे लागले.
या निकालामुळे हिंदुस्थानची विजयाची टक्केवारी 53.33 वरून 51.51पर्यंत घसरली आहे. पण तरीही हिंदुस्थानचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर कायम आहे. दुसरीकडे श्रीलंकेची विजयाची टक्केवारी 33.33वर कायम राहिली असून अंतिम फेरीच्या शर्यतीत असलेल्या नऊ संघांमध्ये तो सहाव्या स्थानावर आहे.
दिनुशाचे झुंजार शतक
संपूर्ण मालिकेत प्रभावी कामगिरी करणाऱ्या दिनुशाने तिसऱ्या आणि अंतिम सत्रातही फटकेबाजी कायम ठेवत सामन्यातील आपले दुसरे शतक पूर्ण केले. श्रीलंकेच्या आठ विकेट पडल्यानंतर फलंदाजीला आलेल्या लाहिरू पुमाराने त्याला उत्तम साथ दिली. पुमाराने 90 चेंडूंमध्ये 12 धावा करून हिंदुस्थानच्या सामना जिंकण्याच्या आशा संपुष्टात आणल्या. त्यानंतर श्रीलंकेचा शेवटचा फलंदाज असिथा फर्नांडो 24 चेंडू खेळून नाबाद राहिला, त्यामुळे दिनुशाला 133 धावांची झुंजार खेळी साकारता आली. दुसऱ्या डावात हिंदुस्थानकडून रवींद्र जाडेजा आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.
ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी
गुणतालिकेतील अव्वल स्थानावर नजर टाकल्यास ऑस्ट्रेलियाने नुकतेच बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत उल्लेखनीय पुनरागमन करत मोठा विजय नोंदवला. ज्यामुळे त्यांची विजयाची टक्केवारी 80पर्यंत वाढली आणि ते अव्वल स्थानी भक्कम स्थितीत पोहोचले आहेत. गतविजेता दक्षिण आफ्रिकेचा संघ 75 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे, तर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानी आहे.
आता न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने
हिंदुस्थानीय संघ आता मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये व्यस्त असेल. हिंदुस्थानचा संघ आता थेट नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या शर्यतीत टिपून राहण्यासाठी हिंदुस्थानचे आता सात कसोटी सामने शिल्लक आहेत. ज्यामध्ये न्यूझीलंडविरुद्ध दोन आणि मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांचा समावेश आहे.

























































