
हिंदुस्थानी क्रिकेटमधील दोन दिग्गजांची पुढची पिढी आता मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागची प्रथमच हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी आर्यवीरला संघात स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड याचीही पुन्हा एकदा वन डे संघात निवड झाली असून सेहवाग आणि द्रविड या माजी स्टार क्रिकेटरची मुले एकाच संघातून खेळताना दिसणार आहेत.
उजव्या हाताचा फलंदाज असलेला आर्यवीर सेहवाग सध्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये वेस्ट दिल्ली लायन्सकडून खेळत आहे. 2024च्या कूचबिहार करंडकात मेघालयविरुद्ध तब्बल 297 धावांची झुंजार खेळी करत त्याने आपली क्षमता दाखवून दिली होती. त्यानंतर आता थेट हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघाचे दार त्याच्यासाठी उघडले आहे. यष्टिरक्षक-फलंदाज अन्वय द्रविड यालाही वन डे संघात स्थान मिळाले आहे. जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यावर हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघाकडून खेळताना अन्वयने 87 धावांची प्रभावी खेळी केली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याने संघातील स्थान कायम राखले आहे. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांच्या संघात आर्यवीर आणि अन्वय या दोघांनाही स्थान मिळालेले नाही. हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघांमधील तीन वन डे सामने सप्टेंबरमध्ये राजकोट येथे होणार आहेत.
बापाच्या पावलावर पोरांची वाटचाल
हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये दिग्गज वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवण्याची परंपरा जुनी आहे. सुनील गावसकर यांचा मुलगा रोहन गावसकरने हिंदुस्थानकडून 11 वन डे सामने खेळले. 1983च्या विश्वविजेत्या संघातील रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीने कसोटी, वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. योगराज सिंह यांचा मुलगा युवराज सिंहने तर वडिलांच्या पलीकडे जाऊन हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये स्वतंत्र इतिहास रचला. 2007 टी-20 विश्वचषक आणि 2011 वनडे विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा तो महत्त्वाचा सदस्य होता. 2011च्या विश्वचषकात त्याला मालिकावीराचा मान मिळाला. विजय मांजरेकर यांचा मुलगा संजय मांजरेकरनेही हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. संजयने 37 कसोटी आणि 74 वनडे सामने खेळले. लाला अमरनाथ यांच्या पुटुंबाचीही भारतीय क्रिकेटला मोठी परंपरा लाभली असून त्यांचे पुत्र सुरिंदर, मोहिंदर आणि राजिंदर यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. त्यापैकी मोहिंदर अमरनाथ 1983च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य होते. आता सेहवाग आणि द्रविड यांच्या मुलांच्या रूपाने हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये आणखी एका प्रसिद्ध क्रिकेटिंग वारशाची नवी इनिंग सुरू झाली आहे.
हिंदुस्थानचा 19 वर्षांखालील वन डे संघ ः
लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), यशवर्धन चौहान (उपकर्णधार), रजत बघेल, आर्यवीर सहवाग, व्ही.के. विनीत, कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनाल चौहान, अन्वय द्रविड (यष्टिरक्षक), व्ही. यशवीर, रोहित यादव, शाविन विनोद, मोहित उल्वा, चिगुरुपती वेंकट आणि काव्य पटेल.

























































