महाराष्ट्राच्या 114 पर्यटकांचा संपर्क तुटला… चिंता वाढली! नेपाळमधील हिमस्खलनात 290 हिंदुस्थानी बेपत्ता, 389 मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या भीषण महापुराने प्रलय आणला. या पुरात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 389 जणांचे मृतदेह सापडले असून 1,500पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. यात हिंदुस्थाच्या 290 नागरिकांचादेखील समावेश आहे. या महापुरामुळे महाराष्ट्रातील 114पेक्षा जास्त पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. त्यापैकी 61 पर्यटक हे रिचा ट्रव्हल्समार्फत नेपाळमध्ये गेले आहेत. मुंबईतील नामवंत डॉक्टर दांपत्याचाही त्यामध्ये समावेश आहे. आतापर्यंत फक्त 4 लोकांशी संपर्क झाला असून दीडशे लोक तिबेटमध्ये सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. बेपत्ता नागरिकांचा कोणताही थांगपत्ता लागत नसल्यामुळे चिंता वाढली आहे.

प्रचंड पूर आणि चिखलाच्या लोंढय़ामुळे अनेक गावे उद्ध्वस्त झाली असून रस्ते, पूल आणि इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. ड्रोन आणि उपग्रहांद्वारे प्राप्त झालेल्या छायाचित्रांमध्ये या भागात सर्वत्र महाविनाश झालेला दिसून येत आहे. अनेक इमारतींचे काही मजले अक्षरशः चिखलामध्ये दबले आहेत. या चिखलात अनेक घरे गाडली गेली आहेत. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर काही जणांनी पोस्ट केले आहेत. त्यात तलाव फुटल्यानंतर भोटे कोशी नदीत अचानक पाण्याचा मोठा प्रवाह खाली जाताना दिसतो. जसजसा हा प्रवाह खाली जातो, तसा त्याचा वेग आणि उंची वाढत गेली. या प्रवाहाच्या मार्गात जी गावे आली ती उद्ध्वस्त झाली. या सर्व मलब्याचा प्रवाह खाली येत असल्याचे दिसताच लोक जिवाच्या आकांताने पळताना दिसतात.

पुन्हा पुराचा धोका

बुधवारच्या प्रलयामुळे झालेल्या हानीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच वेळी भोटेकोशी नदीमध्ये पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे. या नदीचा प्रवाह अडल्यामुळे एका ठिकाणी तलाव निर्माण झाला असून तो फुटण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या नदीकाठच्या नागरिकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातील अनेक पर्यटकांशी संपर्क नाही

‘हिल्स अँड ट्रेल्स’ आणि ‘रिचा टूर्स प्रा.लि.’ या मुंबईतील टूर कंपन्यांमार्फत नेपाळला गेलेल्या पर्यटकांमध्ये मुंबईसह पुणे, नागपूर आणि राज्यातील अन्य जिह्यांतील पर्यटकांचाही समावेश आहे. मात्र बुधवारी सकाळनंतर त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. राज्य सरकारने पाठवलेल्या माहितीनंतर केंद्र सरकारने नेपाळ सरकारशी संपर्क करून पर्यटकांची माहिती दिली आहे. त्यानंतर नेपाळ सरकारचे पथक संबंधित ठिकाणी रवाना झाल्याची माहिती मिळते.

नागपूरचे 106 नागरिक सुरक्षित, आज बिहारमध्ये पोहोचणार

नेपाळमधील महापुरात मृत पावलेल्यांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. पाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांशी पेंद्रामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले. तिबेटमध्ये गेलेल्या काही जणांशी संपर्क झाला आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, नेपाळमध्ये नागपूरचे 106 प्रवाशी अडकले होते. त्यांना बिहारच्या सीमेजवळील जनकपूर येथून पुढे दानापूर मार्गे नागपुरात रेल्वेने आणण्याची सोय करण्यात आली आहे.

चीनने माहिती वेळेत दिली नाही

नेपाळमधील प्रलयानंतर चीनवर माहिती न दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. चीनने वेळेवर माहिती दिली असती, तर शेकडो प्राण वाचविता आले असते. नेपाळ आणि चीनमध्ये हवामानाबाबत माहितीचे आदानप्रदान करण्याची व्यवस्था आहे. 26 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी ग्लेशियर फुटला आणि 9 वाजता ल्हेंदे नदीला पूर आला. त्यामुळे चीनकडे माहिती देण्यासाठी पुरेसा कालावधी होता, असा आरोप करण्यात येत आहे.

बेपत्ता नागरिकांना शोधण्याचे मोठे आव्हान

आता सर्वात मोठे आव्हान बेपत्ता झालेले नागरिक आणि पर्यटकांना शोधण्याचे आहे. नेपाळमध्ये संपर्काबाहेर असलेल्या हिंदुस्थानींमध्ये विविध राज्यांतील नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत 54 हिंदुस्थानी नारिकांना सुरक्षित वाचविण्यात आल्याची माहिती हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. या नागरिकांना मैथिली येथील नेपाळी सैन्याच्या प्रशिक्षण केंद्रात ठेवण्यात आले आहे.

हिमालय वितळतोय… सर्वात मोठा धोका उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशला

नेपाळमधील प्रलयंकारी पुरानंतर संपूर्ण हिमालयातील ग्लेशियरांशी संबंधित धोक्यांकडे लक्ष वेधले आहे. हिमालयातील अनेक ग्लेशियर वितळत आहेत. त्यामुळे भविष्यात मोठय़ा प्रलयाची भीती या संशोधन संस्थांनी व्यक्त केली आहे. या भागात 221 ग्लेशियर तलावांची ओळख पटविण्यात आली असून ते फुटल्यास अचानक महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो. याचा सर्वात मोठा धोका उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशच्या काही भागांना आहे. वाडिया हिमालय भूविज्ञान संस्थेसह तीन संस्थांनी या भागात संशोधन केले आहे. त्यातून हे धोके उघड झाले आहेत. उत्तरखंडला ग्लेशियर तलावांसह हँगिंग तलावांचाही धोका आहे. अलकनंदा बेसीनमध्ये 219 हँगिंग ग्लेशियर आढळले आहेत. ते फुटल्यास बद्रीनाथ तसेच चमोलच्या खालच्या बाजूला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. संशोधनानुसार, हिमालयात सुमारे 9 हजारांपेक्षा जास्त ग्लेशियर तलाव आहेत. 1990नंतर 1052 नवे तलाव तयार झाले आहेत.

मुंबईतील डॉक्टर दाम्पत्य अडकले

मुंबईच्या अंधेरीतील डॉ. आनंद देशपांडे आणि त्यांच्या पत्नी डॉ. गायत्री देशपांडे हे दाम्पत्य नेपाळमध्ये अडकले आहे. डॉ. देशपांडे हे हिंदुजा रुग्णालयात ट्रान्सफ्युजन मेडिसीन विभागाचे प्रमुख आहेत, तर डॉ. गायत्री देशपांडे नानावटी रुग्णालयाच्या प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्र विभागाच्या प्रमुख आहेत.  टूर कंपनीमार्फत ते नेपाळला गेले आहेत. त्यांची भाची मैथिली मुंडले यांनी बुधवारी सकाळी त्यांच्याशी फोनवरून बोलणे केले होते. मात्र त्यानंतर त्यांचा अद्यापपर्यंत संपर्क झालेला नाही.