
नेपाळमधील भीषण महापुराच्या संकटादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुरात प्राण गमावलेल्या एका महिलेच्या मृतदेहावरून सोन्याचे कानातले चोरल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेपाळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
नेपाळ सध्या गेल्या दशकातील सर्वात विनाशकारी पुराचा सामना करत आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत जवळपास 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत समोर आलेल्या एका 41 सेकंदांच्या व्हिडिओने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. या व्हिडिओमध्ये दोन पुरुष चिखलात रुतलेला एका महिलेचा मृतदेह तिच्या केसांनी बाहेर ओढताना आणि लाकडी फळ्यांचा वापर करताना दिसत आहेत. मृतदेह बाहेर काढल्यानंतर ते दोन्ही पुरुष महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने काढून बाजूला ठेवताना स्पष्टपणे दिसत आहेत. या कृत्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात असून, नेपाळ पोलिसांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे.


























































