
घरची परिस्थिती हलाखीची… क्रिकेट खेळण्याची जिद्द मात्र प्रचंड! हातात क्रिकेटची बॅटही नसताना बहिणीने पैसे उधार घेऊन आपल्या भावासाठी पहिली बॅट विकत घेतली. त्या छोट्याशा त्यागातून सुरू झालेला प्रवास आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मोठ्या व्यासपीठावर पोहोचला आहे. हिंदुस्थानविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेचा युवा फलंदाज सोनल दिनुशाने जिद्दीला आणि वर्षानुवर्षांच्या मेहनतीला धावांच्या रूपात उत्तर देत श्रीलंकेच्या क्रिकेटला नवा तारा मिळवून दिला आहे. मालिकेत तब्बल 420 धावा आणि तीन शतके झळकवत दिनुशाने हिंदुस्थानच्या फिरकीसमोर आपले वेगळे अस्त्रही दाखवून दिले.
बहिणीच्या त्यागातून क्रिकेटची पहिली पायरी
दिनुशाचे प्रशिक्षक आशान प्रियंजन यांनी त्याच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण करून दिली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. क्रिकेट खेळण्याची इच्छा असूनही त्याच्याकडे स्वतःची बॅट नव्हती. अखेर त्याच्या बहिणीने पैसे उधार घेऊन दिनुशासाठी पहिली बॅट विकत घेतली. हीच बॅट त्याच्या क्रिकेट प्रवासातील महत्त्वाची सुरुवात ठरली. दिनुशाचा क्रिकेटकडे वळण्याचा किस्साही तितकाच रंजक आहे. शाळेत तो सुरुवातीला बास्केटबॉल खेळत होता. त्यावेळी शाळेचे प्रशिक्षक सुसंथा फेलिक्स डायस यांनी त्याच्यातील गुणवत्ता ओळखली आणि त्याला क्रिकेट संघात स्थान दिले. क्रिकेटचे साहित्य तर दूरच, त्याच्याकडे साधी बॅटही नव्हती. मात्र परिस्थितीने त्याची जिद्द मोडली नाही. कोलंबो क्रिकेट क्लबमध्ये 11-12व्या वर्षी दिनुशाला पहिल्यांदा पाहिल्यानंतर प्रियंजन यांनी त्याच्यातील क्षमता ओळखली.
दररोज दोन तास स्वीपचा सराव
प्रशिक्षकांचा सल्ला दिनुशाने अक्षरशः ध्येय बनवला. त्याने दररोज नेटमध्ये जवळपास दोन तास स्वीप आणि रिव्हर्स स्वीपचा सराव केला. हिंदुस्थानविरुद्धच्या मालिकेत याच फटक्यांनी त्याला मोठे यश मिळवून दिले. याच फटक्यांनी त्याने मालिकेत तब्बल 173 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शॉर्ट बॉलविरुद्ध अडचणी जाणवल्यानंतरही दिनुशाने हार मानली नाही. त्याने थ्रोडाऊन तज्ञासोबत अतिरिक्त सराव सत्रांची मागणी केली. या मेहनतीचे फलितही लगेच दिसले. त्यानंतरच्या सलग दोन अनधिकृत कसोटी सामन्यांत त्याने 105 आणि 88 धावांची खेळी केली.






























































