
कुंभमेळ्यानिमित्त नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये एकाचवेळी कामे सुरू झाल्याने नागरिकांना त्रास होत आहे, यामुळे शिव्या खाव्या लागत आहेत. पण, परिवर्तन करताना शिव्या खाव्याच लागतात. विकासकामे पूर्ण झाल्यानंतर फुलांचे हार मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने ठक्कर डोम येथे आयोजित ‘सिंहस्थ महापुंभ भक्ती संगम’ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते. नाशिक-त्र्यंबकेश्वरची पन्नास लाख नागरिकांचा भार सोसण्याची क्षमता आहे. कुंभमेळ्यानिमित्त कोटय़वधी लोक येणार आहेत. निश्चित किती येणार याचा अंदाज लागत नाही. कारण, प्रयागराजच्या कुंभात अपेक्षेपेक्षा पाचपट लोक आले होते, तसाच विक्रम येथे होईल. त्यादृष्टीने व्यवस्था करण्याचे नियोजन आहे, असे सांगून ते म्हणाले, पुंभमेळ्यासाठी 34 हजार कोटी रुपयांचा खर्च कशाला असे विचारले जात आहे. पण, त्यातील 93 टक्क्यांपर्यंतचे पैसे हे कायमस्वरुपी म्हणजे पन्नास वर्षांपर्यंतच्या व्यवस्थेवर खर्च केले जात आहेत, असे ते म्हणाले.
खड्डेमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी महिन्यातून एकदा नाशिकला यावे
‘मुंबईहून नाशिकला येताना सतत ट्रफिक जाम असते, हाडं खिळखिळी होतात. काल मात्र मी अर्धा-एक तास लवकर नाशिकला पोहोचलो. मुख्यमंत्री येणार म्हणून खड्डे बुजविण्याचे काम सगळीकडे सुरू आहे. आम्ही तुमचे आभारी आहोत. महिन्यातून एकदा तुम्ही नाशिकला या’, अशी टोलेबाजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात केली.






























































