
मुंबईतील तळागाळातील क्रिकेटपटूंना पाठिंबा देण्यासाठी आता मुंबई क्रिकेट संघटनेकडून ‘अजिंक्य रहाणे शिष्यवृत्ती निधी’ देण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या एमसीएच्या अपेक्स कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबईपासून ते हिंदुस्थानी कसोटी संघाचे नेतृत्व करण्यापर्यंतच्या अजिंक्य रहाणेच्या उल्लेखनीय क्रिकेट प्रवासाच्या सन्मानार्थ एमसीएच्या या शिष्यवृत्ती निधी’ला अपेक्स काwन्सिलच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या निधीला आयसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार मोलाचे योगदान मिळाले आहे. या निधीचा उपयोग मुंबईच्या मैदानातील क्रिकेटच्या विकासासाठीही केला जाईल, ज्यामुळे मुंबई क्रिकेटचा पाया मजबूत होईल आणि आश्वासक तरुण खेळाडूंसाठी अधिक संधी निर्माण होतील.
या बैठकीत निवड समितीने शिफारस केल्यानुसार खेळाडू करार प्रणालीअंतर्गत समाविष्ट करायच्या खेळाडूंच्या यादीला मंजुरी देऊन अंतिम रूप दिले. खेळाडूंची ग्रेड ए, बी आणि सी मध्ये विभागणी करण्यात आली आहे. ग्रेड एसाठी 12 लाख रुपये, ग्रेड बीसाठी 8 लाख रुपये आणि ग्रेड सीसाठी 6 लाख रुपये ही वार्षिक कराराची रक्कम आहे. अजिंक्य रहाणेचा प्रवास प्रत्येक तरुण क्रिकेटपटूसाठी प्रेरणादायी आहे. त्याची शिस्त, चिकाटी आणि सर्वोच्च स्तरावरील कामगिरी त्याला पुढच्या पिढीसाठी आदर्श बनवते. शरद पवार यांच्या मौल्यवान योगदानाने सुरू झालेला ‘अजिंक्य रहाणे शिष्यवृत्ती निधी’ तळागाळातील क्रिकेटपटूंना आणि आपल्या मैदानांच्या विकासाला पाठिंबा देईल. आम्हाला आशा आहे की हा उपक्रम तरुण खेळाडूंना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अधिक संधी देईल असा विश्वास एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी बोलून दाखविला.





























































