
भारताने वेगवान प्रगतीची नवी उंची गाठली आहे. असे ढोल परदेशातून सेल्फी व्हिडीओवरून पिटणाऱ्या मोदींना दररोज वाढणारी महागाईची उंची दिसत नाही. जीडीपी वाढीच्या 7.8 टक्के आकडयाने ते हुरळून गेले, परंतु सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी चौफेर दरवाढीच्या आकड्यांनी सर्वसामान्यांचे जगणे आणखी असह्य केले आहे याचे त्यांना दुःख नाही. रुपयाचा सातत्याने घसरणारा आणि बेरोजगारांचा वाढत जाणारा आकडा त्यांना अस्वस्थ करीत नाही. देशात दरवाढीचा वणवा पेटला आहे. तो विझवण्याऐवजी मोदी त्यावर जीडीपी वाढीची फुंकर घालत आहेत! अर्थात, मोदींच्या या अर्थ ‘थापां’ना जनता आता भुलणार नाही!
पंतप्रधान मोदी हे एका अजब साच्यातून निर्माण झालेले व्यक्तिमत्त्व आहे. मोदी ‘बाबरा’च्या देशी फिरत असताना त्यांना साक्षात्कार झाला की, भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरू आहे. देशाचा जीडीपी 7.8 टक्के वाढला. मोदी यांची ही थापेबाजी अजबच आहे. रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षाही देशाची अर्थव्यवस्था वेगात दौडत असल्याचे स्वप्नरंजन मोदी यांनी केले आहे. भारत पुन्हा एकदा जिंकला असल्याची आरोळी मोदी यांनी एका ‘रील’द्वारे ठोकली. गौतम अदानी पैशांच्या दौडबाजीत जिंकले म्हणजे भारत जिंकला असे बहुधा त्यांना वाटत असावे. ज्या देशात 85 कोटी जनता मोदींनी फेकलेल्या
10 किलो फुकट धान्यावर जगते, त्या देशाचा ‘जीडीपी’ वाढला, कोसळला किंवा मेला याला काय अर्थ उरतो? देशात वर्षभरात सात हजारांवर शेतकऱयांनी आत्महत्या केल्या हे अर्थव्यवस्थेच्या घोडदौडीचे चित्र म्हणावे काय? महाराष्ट्रासारख्या राज्यात ‘ठेकेदार’ मंडळींची 90 हजार कोटींची बिले थकली व त्यामुळे आतापर्यंत 17 ठेकेदारांनी आत्महत्या केल्या. याचा अर्थ राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, पण ‘पीएम केअर’ फंडात मात्र 10 हजार कोटी नुसते पडून आहेत. या पैशांचा विनियोग गोरगरीबांच्या कल्याणासाठी व्हावा असे मोदींना का वाटू नये? या काळात गौतम अदानीसारख्यांच्या संपत्तीची ‘दौड’ वाढली. विरोधी पक्षांच्या
आमदार–खासदारांचे भाव
पन्नास कोटींवरून 75-100 कोटींवर वाढवले. म्हणजे ‘महागाई’ वाढली व त्यावर मोदी-शहा ‘उतारा’ देत आहेत, पण सामान्य जनांच्या होरपळीचे काय? देशात महागाईचा भडका उडाला आहे व मोदी परदेशातून सेल्फी व्हिडीओद्वारे भारताची ‘प्रगती’ झाल्याच्या थापा मारीत आहेत. देशात ऐन सणासुदीच्या दिवसांत साखरेच्या भयंकर दरवाढीने सामान्यांचे तोंड कडू केले आहे. या वणव्यात 1 सप्टेंबरपासून चौफेर दरवाढीचे तेल ओतले गेले आहे. त्यावर ‘रील’स्टार मोदींनी तोंड उघडलेले नाही, परंतु जीडीपी वाढीचा दर 7.8 टक्के एवढा नोंदवला गेला, याचा गवगवा मात्र ते करीत आहेत. त्यासाठी त्यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींना कागदावरील जीडीपीच्या आकड्यांचे कौतुक आहे, परंतु रोजच्या दरवाढीच्या आकड्यांशी त्यांना देणेघेणे नाही. प्रगतीचे श्रेय ते घेत आहेत. परंतु महागाई रोखण्यास आलेल्या अपयशाचे माप स्वतःच्या पदरात घ्यायला तयार नाहीत. गणरायांच्या आगमनाला दोन आठवडे राहिले आहेत आणि साखर-गुळापासून, दूध-भाज्यांपर्यंत, धान्यापासून इंधनापर्यंत सर्वच गोष्टींचे भाव कडाडले आहेत. साखरेच्या स्वस्ताईच्या सरकारी वल्गना खोटय़ा ठरल्या आहेत. गुळाची किंमत 25 टक्के वाढली आहे. कांदा 50 रुपयांवर गेला आहे. मुंबईत 1 सप्टेंबरपासून दूध प्रतिलिटर थेट 9-10 रुपयांनी महाग झाले आहे. सीएनजी महाग झाला आहे. घरगुती पीएनजी
गॅसच्या दरात
एक रुपयाने वाढ झाली आहे. सीएनजी, पेट्रोल-डिझेल महागल्याने रिक्षा-टॅक्सीच्या भाडय़ात वाढ झाली आहे. दूध-साखर महागल्याने साध्या कटिंग चहाची तल्लफ भागविण्यासाठी गरीबांना 13 रुपये मोजावे लागणार आहेत. कृषी क्षेत्राची वाढ 4.4 टक्क्यांवरून 3.6 टक्क्यांवर घसरली आहे. पावसाने महिनाभर दडी मारल्याने बळीराजाच्या खरीप हंगामावर संकटाचे ढग आले आहेत. जग संकटात असतानाही भारताने वेगवान प्रगतीची नवी उंची गाठली आहे. असे ढोल परदेशातून सेल्फी व्हिडीओवरून पिटणाऱ्या ‘रील’स्टार मोदींना दररोज वाढणारी महागाईची नवी उंची दिसत नाही. जीडीपी वाढीच्या 7.8 टक्के आकडय़ाने ते हुरळून गेले, परंतु सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी चौफेर दरवाढीच्या आकडय़ांनी सर्वसामान्यांचे जगणे आणखी असह्य केले आहे, डाळ-भातापासून सणासुदीच्या पुरणपोळी-मोदकापर्यंत सर्वच त्यांच्या आवाक्याबाहेर गेले याचे त्यांना दुःख नाही. रुपयाचा सातत्याने घसरणारा आणि बेरोजगारांचा वाढत जाणारा आकडा त्यांना अस्वस्थ करीत नाही. देश जर प्रगतीची नवी उंची गाठत असेल, तर 85 कोटी जनतेला 10 किलो फुकट धान्य का द्यावे लागत आहे, असा प्रश्नही त्यांना पडत नाही. देशात महागाई, दरवाढीचा वणवा पेटला आहे. तो विझवण्याऐवजी मोदी त्यावर जीडीपी वाढीची फुंकर घालत आहेत! अर्थात, मोदींच्या या अर्थ ‘थापां’ना जनता आता भुलणार नाही!






























































