विहिरीच्या बिलासाठी लाच मागितली, नांदेड येथे शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विहिरीचे बिल मंजूर करण्यासाठी लाच मागितल्याने 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याने शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेडमधील भेंडगाव येथे घडली आहे. अंकुश नाना लिबोटकर असे शेतकऱ्याचे नाव असून त्याच्या पत्नीने अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना जाहीर केल्या जातात. मात्र या योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांची शासनदरबारी फरफट नेहमीचीच ठरलेली आहे. त्यातूनच अंकुश नाना लिबोटकर यांचा बळी गेला आहे. अंकुश यांच्याकडे बिल मंजूर करण्यासाठी लाच मागितली जात होती. पैशांची मागणी करून त्यांना सतत त्रास दिला जात होता. त्या त्रासाला कंटाळूनच त्यांनी जीवन संपवले. घरातील कमावता पुरुष गमावल्याने लिबोटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पत्नीचा रोजगार सेवकावर आरोप

अंकुश यांची पत्नी मीनाबाई यांनी पोलिसांकडे दिलेल्या जबाबात गंभीर आरोप केले आहेत. विहिरीच्या अंतिम बिलाच्या मंजुरीसाठी रोजगार सेवक अविनाश कांबळे यांनी मोठ्या रकमेची लाच मागितल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या आरोपांची चौकशी करण्यात यावी व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीही शेतकऱ्याला लाच द्यावी लागत असेल. त्याला मानसिक त्रास दिला जात असेल, आत्महत्येस प्रवृत्त केले जात असेल तर शेतकरी आत्महत्या कशा थांबणार, असा सवालही ग्रामस्थांनी विचारला.