पडद्यावर ‘साईबाबा’ साकारणाऱ्या सुधीर दळवींच्या उपचारासाठी मदतीचा हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात साईबाबांची अजरामर भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी गंभीर आजारपणानंतर आता हळूहळू बरे होत आहेत. ‘सेप्सिस’ या धोकादायक संसर्गामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील वाढत्या बिलामुळे दळवी कुटुंबीय आर्थिक संकटात सापडले होते. मात्र, या संकटाच्या काळात अनेकांनी मदतीसाठी हात पुढे केला, असे सुधीर दळवी यांच्या पत्नी सुहास यांनी एका मुलाखतीत सांगितले.

ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी गतवर्षी ऑक्टोबरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या सांध्यांवर गंभीर परिणाम झाल्याने त्यांना काही काळ आयसीयूमध्ये ठेवावे लागले होते. उपचारांसाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असल्याने दळवी कुटुंबीयांनी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार कलाकारांसह साईभक्तांनी सढळ हस्ते मदत केली. या कठीण काळात लोकांनी दाखवलेली आपुलकी आणि प्रेम पाहून मन भरून आले, अशा शब्दांत सुहास दळवी यांनी सर्वांचे आभार मानले.

सुधीर दळवी यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना त्या म्हणाल्या, ते आता घरी परतले असून वॉकरच्या आधाराने हळूहळू चालत आहेत. वयामुळे ते थोडे गोंधळलेले असतात, पण घरी आल्याने आम्ही दोघेही खूप खूश आहोत. रुग्णालयाचा खर्च तर मोठा होताच, शिवाय तिथले वातावरण रुग्णासाठी भीतीदायक असते.

अक्षय, रणबीर, कार्तिक आर्यनने केली मदत

रुग्णालयाची बिले भरणे शक्य होत नाहीये, ही बातमी समजताच चित्रपटसृष्टीतील अनेक लोक आर्थिक मदतीसाठी पुढे आले. मला सर्वांची नावे लगेच आठवणार नाहीत, पण कार्तिक आर्यन, रणबीर कपूर आणि अक्षय कुमार हे मदत करणाऱ्यांमध्ये आघाडीवर होते, असे सुहास दळवी म्हणाल्या. माझे पती साईबाबांच्या भूमिकेसाठी ओळखले जात असल्याने अनेक साईभक्तांनीही सढळ हाताने मदत केली, असेही दळवी यांनी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयानेदेखील सुधीर दळवी यांच्या उपचारांसाठी ‘श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट’कडून 11 लाख रुपयांच्या अनुदानाला मंजुरी दिली होती.

आता पैशांची नव्हे, प्रार्थनांची गरज…

दरमहा प्रेमाने पैसे पाठवणाऱ्या फिल्म असोसिएशनला विनंती करत सुहास दळवी म्हणाल्या, माझ्या पतीला जितकी वैद्यकीय मदतीची गरज होती, तितकी मिळाली आहे. त्यांनी ते पैसे आता दुसऱ्या एखाद्या गरजू व्यक्तीसाठी वापरावे. आता त्यांना फक्त तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. मी आम्हा दोघांची काळजी घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतेय.