
मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यातील हिंदुस्थान-म्यानमार सीमाभागातून विविध बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या भागातील हालचालींवर सतत पाळत ठेवण्यात आली होती. तसेच गुप्त माहितीच्या आधारे आयवोमजांग गावात सुरू असलेल्या शोधमोहिमेदरम्यान आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी या चौघांना ताब्यात घेतले.
आसाम रायफल्सच्या एका निवेदनानुसार, बंदी घातलेल्या युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (कोयरेंग) चे तीन सदस्य आणि बेकायदेशीर ठरवलेल्या प्रेपाक (Prepak) चा एक सदस्य असे चार सशस्त्र दहशतवादी हिंदुस्थानच्या हद्दीत घुसले होते, आणि त्यांचा पुन्हा म्यानमारच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला.
त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी या चारही दहशतवाद्यांना मोल्चम पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले, असे त्यात म्हटले आहे.
त्यांच्याकडून म्यानमारचे चलन जप्त करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
तीन वर्षांपूर्वी राज्यात उसळलेल्या वांशिक हिंसाचारानंतर सुरक्षा दल मणिपूरमध्ये सातत्याने शोधमोहीम राबवत आहेत.
मे २०२३ पासून मेईतेई आणि कुकी-झो समुदायांमध्ये सुरू असलेल्या या वांशिक हिंसाचारात २६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक बेघर झाले आहेत.





























































